ठाणे,दि.1: अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) राज्य आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात अन्न सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी एक मोठी आणि सलग मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी एपीएमसी मार्केट (नवी मुंबई परिसर) आणि इतर विविध भागांमध्ये ३० आणि ३१ मे २०२६ रोजी अचानक धाडी टाकून अत्यंत मोठी कायदेशीर कारवाई केली आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत आंब्याची मागणी मोठ्या प्रमाणावर असते, याचाच गैरफायदा घेत काही व्यापारी आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी चुकीच्या पद्धतींचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. या धाड सत्रादरम्यान आंबे पिकवण्यासाठी इथिलिन (Ethylene) सदृश्य स्प्रेचा थेट वापर करणाऱ्या तीन मोठ्या प्रतिष्ठानांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. या कारवाईत संबंधित ठिकाणांवरून तब्बल ३,४५३ किलो आंब्याचा साठा जप्त करण्यात आला असून, या जप्त केलेल्या आंब्यांची एकूण किंमत ११ लाख १२ हजार ८५० रुपये इतकी आहे.
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) नियमांनुसार, आंबे किंवा इतर फळे पिकवण्यासाठी थेट फळांवर इथिलिन स्प्रे मारण्यास सक्त मनाई आहे. व्यापाऱ्यांनी नियमानुसार सुरक्षित अशा इथिलिन गॅस चेंबरचाच वापर करणे बंधनकारक आहे. मात्र, तपासणी दरम्यान अनेक व्यापारी नियमांचे उल्लंघन करून थेट फळांवरच स्प्रे मारताना रंगेहात पकडले गेले. या जप्त केलेल्या आंब्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी आणि विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर पुढील कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या तपासणीत कॅल्शियम कार्बाइडसारख्या अत्यंत जीवघेण्या आणि घातक रसायनाचा वापर कुठेही आढळून आलेला नाही, परंतु इथिलिन स्प्रेचा चुकीचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यासोबतच, जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून २९ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखू यांसारख्या आरोग्याला घातक व प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या विरोधातही नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट व ठाणे जिल्ह्यात व्यापक मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईत एकूण ३६ प्रतिष्ठानांवर कायदेशीर बडगा उगारण्यात आला आहे. या प्रतिबंधित पदार्थांच्या कारवाई दरम्यान प्रशासनाने ४ लाख ७४ हजार ४०७ रुपये किमतीचा गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त केला आहे. बेकायदेशीरपणे या पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये प्रथम खबरी अहवाल (FIR) दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी आतापर्यंत ३७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या एकूण ३१ प्रतिष्ठानांना प्रशासनाने तात्काळ सील ठोकले आहे.
अन्न व औषध प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा भेसळखोर आणि बेकायदेशीर व्यापाऱ्यांविरोधातील ही धाड सत्र मोहीम यापुढेही अशीच सातत्याने सुरू राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यासोबतच समाजात अशा प्रतिबंधित पदार्थांची विक्री किंवा अन्नातील भेसळीबाबत नागरिकांना कोणतीही माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांसाठी आवाहन आणि तक्रार केंद्र:
प्रतिबंधित आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांचे १००% निर्मूलन करण्यासाठी जनतेने प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे. कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवण्यासाठी किंवा गैरप्रकाराची माहिती देण्यासाठी प्रशासनाने १८००२२२३६५ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. तसेच नागरिक आपली तक्रार लेखी स्वरूपात 'सह आयुक्त (कोकण विभाग), अन्न व औषध प्रशासन कार्यालय, वरदान एमआयडीसी बिल्डिंग, तळमजला, वागळे इस्टेट, रोड नंबर १६, ठाणे (पश्चिम) - ४००६०४' येथे देखील नोंदवू शकतात, असे आवाहन कोकण विभागाच्या सहआयुक्त (अन्न) श्री.पराग नलावडे यांनी केले आहे.

