गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी सत्कार; शिक्षणातून सक्षम समाज घडविण्याचा संकल्प
कल्याण | प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव म्हणजे उज्ज्वल भविष्याचा सन्मान, या भावनेतून शिवसेना नगरसेवक/संपर्क प्रमुख तसेच मातोश्री गुंजाई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ २०२६' उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमात पॅनल क्रमांक १५ अंतर्गत संतोष नगर, तिसगाव, विजय नगर आणि आमराई परिसरातील दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि छत्री देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या डोळ्यांतील समाधानाने कार्यक्रमाला विशेष भावनिक रंग चढला.
कार्यक्रमात बारावीतील रुचिता उमेश दरेकर (८९%), आदित्य हरीबा पाटील (८७%), रोहित श्याम घोगले (८१.५०%), अनन्या चंद्रकांत पाटील (८०%) आणि पियूष बनी सिंह (७७.८३%) यांचा गौरव करण्यात आला.
तसेच दहावीतील मेधांश प्रकाश कदम (९६.२०%), कनिष्क प्रशांत काळे (९५.६०%), साची श्रीकांत पट्टनायक (९५.६०%), मितेश अजमल राठोड (९५.२०%) आणि किंजल कृष्णा वेताळे (९५.००%) या गुणवंत विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी आयोजकांनी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करत, शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम समाज घडविणे आणि प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला प्रोत्साहन देत त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणे हीच आपली कायमची भूमिका असल्याचे सांगितले.
या प्रसंगी नगरसेवक कैलास जोशी, मधुर म्हात्रे, नगरसेविका माया कांबळे, दर्शना काळे, माजी नगरसेवक सुशील माळी, राम बनसोडे, समीप काळे, सुमेध हुमणे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

