Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

‘सायकल चालवा, शहर वाचवा’; केडीएमसी आयोजित सायकल रॅलीमध्ये शेकडो सायकलिस्ट सहभागी

कल्याण-डोंबिवलीतील वाढत्या फिटनेस कल्चरचे आयुक्तांकडून कौतुक

डोंबिवली ( शंकर जाधव ) : आंतरराष्ट्रीय सायकल दिन आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत कल्याण डोंबिवली महानगरपालिका, पोलीस विभाग आणि बिर्ला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “सायकल चालवा, शहर वाचवा” हा संदेश देणाऱ्या या रॅलीमध्ये कल्याण आणि डोंबिवली शहरातील शेकडो सायकलप्रेमींनी सहभाग नोंदवला.

“KDMC Steps Towards Sustainability & Safety For Society Buildings” या जनजागृती उपक्रमांतर्गत आयोजित p या रॅलीची सुरुवात कल्याणमध्ये बी.के. बिर्ला महाविद्यालय परिसरातून आयुक्त अभिनव गोयल यांच्या तर डोंबिवलीत ह.भ.प. संतश्रेष्ठ वै. सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथून पद्मश्री पुरस्कार विजेते गजानन माने, नगरसेविका रंजना पेणकर यांच्या हस्ते ध्वजवंदनाद्वारे करण्यात आली. पर्यावरण संवर्धन, आरोग्यदायी जीवनशैली आणि सुरक्षित वाहतुकीचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमात विविध सायकलिंग ग्रुप, विद्यार्थी, नागरिक आणि पर्यावरणप्रेमींसह अनेक लहान मुलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

यावेळी बोलताना महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी कल्याण-डोंबिवलीतील वाढत्या फिटनेस संस्कृतीचे विशेष कौतुक केले. “शहरात दिवसेंदिवस मॉर्निंग वॉक, सायकलिंग आणि रनिंग या फिटनेसच्या त्रिसूत्रीकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे. हे शहराच्या आरोग्यदायी भविष्यासाठी सकारात्मक संकेत असून त्यामुळे पर्यावरण संरक्षणासोबतच निरोगी जीवनशैलीलाही चालना मिळत असल्याचे प्रतिपादन केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी केले.

तसेच वाढते प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि पर्यावरणीय समस्यांबाबत जनजागृतीसाठी नागरिकांनी दैनंदिन जीवनात अधिकाधिक सायकलचा वापर करावा आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. “KDMC Steps Towards Sustainability and Safety for Society Buildings” या मोहिमेअंतर्गत शहरातील गृहनिर्माण संस्थांमध्ये शाश्वत विकास आणि सुरक्षिततेबाबत व्यापक जनजागृती सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत कचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी पुनर्वापर, वृक्षारोपण, इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट आणि फायर सेफ्टी उपाययोजना या सात महत्त्वाच्या विषयांवर विशेष भर देण्यात येत असल्याचेही आयुक्त गोयल यांनी स्पष्ट केले.

तर यापूर्वी शहरातील विविध नामांकित गृहसंकुलांमध्ये सहा चर्चासत्रांचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून निवासी संस्थांमध्ये वैज्ञानिक आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सायकल उपक्रमाचे नोडल अधिकारी प्रशांत भागवत यांनी दिली.

या रॅलीमध्ये कल्याण सायकलिस्ट ग्रुप, डोंबिवली सायकलिस्ट ग्रुप, बाईक पोर्ट सायकलिस्ट ग्रुप, एव्हरग्रीन सायकलिस्ट ग्रुप, पलावा सायकलिस्ट ग्रुप, हिरकणी महिला सायकल क्लब, पेडल रिपब्लिक सायकल क्लब, सायकल सखी ग्रुप डोंबिवली यांच्यासह अनेक सायकलप्रेमी संघटनांनी सहभाग घेतला. यावेळी सायकल उपक्रमाचे नोडल अधिकारी प्रशांत भागवत यांच्याकडून उपस्थित सर्व नागरिकांना फिट इंडिया मुव्हमेंटअंतर्गत आरोग्यदायी शैली स्वीकारण्याची शपथही देण्यात आली.

कल्याणात झालेल्या कार्यक्रमात बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ.नरेश चंद्र, वरिष्ठ उपप्राचार्य हरीश दुबे, नगरसेवक किरण भांगले, नगरसेविका प्रमिला पाटील, डॉ.तनुजा वायले, केडीएमसी उद्यान अधीक्षक संजय जाधव, ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील, वैष्णवी मॅटर्निटी हॉस्पिटलचे डॉ. अश्विन कक्कर, विद्युत विभागाचे उपअभियंता भागवत पाटील तर डोंबिवीलीतील कार्यक्रमात पद्मश्री गजानन माने, नगरसेविका रंजना पेणकर, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे, सहाय्यक आयुक्त फ प्रभाग प्रसाद ठाकूर, विद्युत विभागाचे उप अभियंता जितेंद्र पाटील यांच्यासह सामाजिक संस्थांचे अनेक मान्यवर उपस्थित होते-
.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |