ठाणे (08) - ठाणे महानगरपालिकेची पहिली सीबीएसई बोर्डाची शाळा आजपासून खारेगांव येथे सुरु झाली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेह-यावरील आनंद हा वेगळाच समाधान देऊन गेला.
यावेळी उपायुक्त शिक्षण डॉ. मिताली संचेती, दीपक झिंजाड उपनगरअभियंता विकास ढोले, विनोद पवार शुभांगी केसवाणी तसेच क्रिसीलचे पदाधिकारी उपस्थित होते.
आज सकाळी 9.00 वा. आज या शाळेची घंटा वाजली. आज या शाळेत 177 विद्यार्थी हजर होते. ठाणे महापालिकेच्या या शाळेला क्रिस्टल हाऊस इंडिया यांचे सहकार्य लाभले आहे. या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा तसेच सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
खारेगाव येथे सफायर रुग्णालयाजवळ ‘ठाणे महानगरपालिका – क्रिस्टल हाऊस शाळा’ असून ठाणे महापालिकेकडून शाळेसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, भाषा प्रयोगशाळा, क्रीडा व कला विभागासाठी स्वतंत्र जागा, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, तसेच इमारतीची दुरुस्ती, रंगरंगोटी, लिफ्ट, सीसीटिव्ही यंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे.
क्रिस्टल हाऊस व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्यांमध्ये प्रशिक्षित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती, विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण, गणवेश, पुस्तके व शैक्षणिक साहित्याचा पुरवठा, विद्यार्थ्यांसाठी भोजन व्यवस्था तसेच शाळेपर्यंत वाहतूक सुविधा यांचा समावेश आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यावरही भर देण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे ठाण्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील सीबीएससी अभ्यासक्रमाचे शिक्षण उपलब्ध होणार असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठीही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी संधी निर्माण होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनीही आयुक्तांशी संवाद साधला

