बुलेट ट्रेनप्रमाणे समान दर, २५ टक्के वाढीव मोबदला आणि मल्टिप्लायर फॅक्टर २ लागू करण्याची प्रमुख मागणी.
ठाणे | प्रतिनिधी : ऐरोली–कटई उन्नत मार्ग (Airoli–Katai Elevated Road Project) प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी व जमीनमालकांना न्याय्य मोबदला मिळावा, यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका वेदिका साहिल पाटील यांनी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, हा प्रकल्प राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचा असला तरी प्रकल्पग्रस्त शेतकरी व जमीनमालकांना मिळणारा मोबदला अपुरा आणि अन्यायकारक असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
यापूर्वी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सुमारे ₹१४,380 प्रति चौरस मीटर दराने मोबदला देण्यात आला होता. मात्र ऐरोली–कटई प्रकल्पासाठी ₹१२.४९५ प्रति चौरस मीटर या नव्या रेडी रेकनर दराच्या आधारे मोबदला निश्चित केला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाप्रमाणेच समान व न्याय्य दराने मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या एकूण मोबदल्यात २५ टक्के वाढ करण्यात यावी आणि मल्टिप्लायर फॅक्टर २ (Multiplier Factor 2) लागू करून न्याय्य भरपाई निश्चित करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होणार नाही, तसेच त्यांच्या आर्थिक नुकसानीची योग्य भरपाई मिळावी यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा वेदिका पाटील यांनी व्यक्त केली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या :
- बुलेट ट्रेन प्रकल्पाप्रमाणे समान दराने मोबदला द्यावा.
- एकूण मोबदल्यात २५ टक्के वाढ मंजूर करावी.
- मल्टिप्लायर फॅक्टर २ लागू करून न्याय्य भरपाई निश्चित करावी.

