Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

बेतवडे शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश; उपोषणाचा विजय सोहळा उत्साहात

शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे बिल्डरला नमावे लागले; न्याय्य मोबदल्याच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आभार सोहळा संपन्न

 दिवा : प्रतिनिधी - बेतवडे गावातील शेतकऱ्यांनी आपल्या न्याय्य हक्काच्या मोबदल्यासाठी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला अखेर यश मिळाले असून, शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्यानंतर विजयाचा आभार सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात उपोषणकर्ते शेतकरी, ग्रामस्थ आणि आंदोलनाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

बेतवडे गावात मॅरेथॉन कंपनीचे मालक मयूर रमणीलाल शहा आणि सागर गाला यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी १० जुलै २०२६ पासून न्याय्य मोबदल्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते. अनेक दिवसांच्या संघर्षानंतर शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्याने उपोषणाची यशस्वी सांगता झाली.

यावेळी बोलताना आमदार राजेश गोवर्धन मोरे यांनी, "शेतकऱ्यांचा हक्क हा कोणाच्याही दयेवर नसून तो संविधानाने दिलेला अधिकार आहे. त्या अधिकारासाठी केलेला प्रत्येक संघर्ष समाजासाठी प्रेरणादायी ठरतो," असे सांगितले. हा विजय केवळ काही मागण्या मान्य झाल्याचा नसून शेतकऱ्यांच्या एकजुटीचा, संयमाचा, चिकाटीचा आणि न्यायाच्या लढ्याचा विजय असल्याचे त्यांनी नमूद केले.

या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या अधिकृत व न्याय्य मोबदल्याचा मार्ग मोकळा झाला असून, अनेक दिवसांच्या संघर्षानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच या लढ्याचे खरे यश असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या विजय सोहळ्यास शिवसेना तालुकाप्रमुख गजानन पाटील, नगरसेवक बाबाजी पाटील, आदेश भगत, दीपक जाधव, नगरसेविका साक्षी रमाकांत मढवी, अर्चना पाटील, संतोष केणे, तसेच बेतवडे गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनीही उपस्थित राहून शेतकरी बांधवांचे अभिनंदन केले.

शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे न्याय्य हक्कासाठीचा संघर्ष यशस्वी ठरल्याचे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |