Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

घरगुती पाणी बिलाच्या थकबाकीवरील प्रशासकीय आकारात (व्याज / दंड) १०० टक्के सूट..

नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे ठाणे महानगरपालिका महापौर व आयुक्तांचे आवाहन.

ठाणे - ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घरगुती पाणी बिलाची थकबाकी असलेल्या नळ संयोजन धारकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, थकीत पाणी बिलावर आकारण्यात आलेल्या प्रशासकीय आकारामध्ये (व्याज/दंड) १०० टक्के सूट देण्याची योजना 01 सप्टेंबर 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत लागू करण्यात आली असून या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी घरगुती नळ संयोजन धारकांनी आपली मागील थकीत पाणी बिलाची रक्कम तसेच चालू आर्थिक वर्ष २०२६ - २७ ची मागणी एकत्रितपणे एकरकमी भरावी लागणार आहे. एकरकमी भरणा करणाऱ्या पात्र ग्राहकांना थकबाकीवरील प्रशासकीय आकार ( व्याज / दंड) पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.

ही सवलत योजना १ सप्टेंबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीपुरतीच लागू राहणार आहे. त्यामुळे थकीत बिल असलेल्या घरगुती ग्राहकांनी निर्धारित कालावधीत बिलाचा भरणा करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


दरम्यान, १ जानेवारी २०२७ नंतरही पाणी बिलाची थकबाकी कायम राहिल्यास संबंधित ग्राहकांच्या नळजोडण्या खंडित करून पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही सवलत योजना व्यावसायिक पाणी ग्राहकांसाठी लागू राहणार नाही. त्यामुळे संबंधित घरगुती ग्राहकांनी मुदतीपूर्वी आपली पाणी बिल देयके भरून प्रशासकीय आकारावरील १०० टक्के सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |