हट्टा ग्रामपंचायतीला लेखी निवेदन देऊन रहिवाशांनी दिला इशारा
हिंगोली - जिल्ह्यातील ता. वसमत, मु. पो. हट्टा हद्दीतील ग्रामपंचायत वार्ड क्र. ४ राधाबाईनगर पूर्वकडे गेल्या २० वर्षांपासून नागरिक राहत आहेत. सदर ठिकाणी घरासमोरून येजा करण्यास कच्च्या मातीचा पायवाट असून या शेतातून पायवाट काढत वाहनधारक, विद्यार्थी, महिला यांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. तसेच रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून वर्षानुवर्षे हा रस्ता दुर्लक्षित राहिला असल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात अनेक वेळा हट्टा ग्रामपंचायतीस तोंडी व लेखी निवेदन पाठपुरावा करण्यात आला. परंतु राधाबाई नगर पूर्वकडील रहिवाशांना ग्रामपंचायत मार्फत रस्त्याची सोय करून दिलेली नाही. या रस्त्या संदर्भात एक वर्षापूर्वी हट्टा ग्रामपंचायत समोर आंदोलन देखील करण्यात आले होते. तरी सुद्धा आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
हट्टा ग्रामपंचायत अंतर्गत राधाबाई नगर पूर्वकडील रस्त्याचा प्रश्न तातडीने लावण्यात यावा अन्यथा लोकशाही मार्गाने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राधाबाई नगर पूर्वकडील पुरुष, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व परिसरातील रहिवाशांना घेऊन दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी बिऱ्हाड मोर्चा आंदोलन करण्यात येणार असल्याचे हट्टा ग्रामपंचायतीला लेखी निवेदन देऊन इशारा तेथील रहिवाशांनी दिला.
याप्रसंगी सुरेश जाधव, मथुराबाई भालेराव, लक्ष्मन कदम, तेजस चट्टे, मुकुंद गायकवाड, सावळा डुकरे, हनुमंत पवार, शबाना अहेमद पठाण, पिराजी डुकरे, अनिल कंगळे, बाळू सिरसाट, शोकत सय्यद यांच्यासह राधाबाई नगर पूर्वकडील नागरिक उपस्थित होते.

