“अभियंते हे जगाचे निर्माते; तांत्रिक ज्ञान व कल्पकतेच्या माध्यमातून समाजाच्या जीवनमानात सुधारणा घडवावी” – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव
ठाणे, दि. २९ सप्टेंबर २०२६ : जिल्हा परिषद, ठाणे आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अभियंता संघटना, शाखा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने अभियंता दिनाचा कार्यक्रम दि. २८ सप्टेंबर, २०२६ रोजी समिती सभागृह, बी. जे. हायस्कूल, ठाणे येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात गुणवंत अभियंता यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पदोन्नती प्राप्त व सेवानिवृत्त अभियंतांना पुरस्कार देण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, “We are the makers of the world.” माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी अभियंते महत्त्वाची भूमिका बजावत असतात. समाजाच्या गरजा लक्षात घेऊन अभियंत्यांनी आपल्या कल्पकतेचा आणि तांत्रिक ज्ञानाचा वापर करून नवीन व दर्जेदार बांधकामे उभारण्यासाठी काम करावे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद प्रशासन आणि अभियंता संघटना यांनी एकत्रितपणे काम करून विकासकामांना अधिक गती देण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांना विविध प्रकारच्या कामांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत असून, निवडणुकीच्या कामकाजासह विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडताना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून काम करण्याची संधी मिळते, असे त्यांनी सांगितले.
सेवानिवृत्त तसेच पदोन्नती झालेल्या अभियंत्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग नवीन कामकाजासाठी आणि मार्गदर्शनासाठी होऊ शकतो. त्यांच्या अनुभवातून नवीन पिढीतील अभियंत्यांना निश्चितच फायदा होईल, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी नमूद केले.
अभियंत्यांच्या तांत्रिक कौशल्यवृद्धीसाठी आवश्यक प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अभियंत्यांनी तांत्रिक बदलांबाबत अद्ययावत राहावे – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी अभियंत्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “अभियंता हा केवळ पदावरून नव्हे, तर आपल्या कृतीतून दिसून येतो. अभियंते हे निर्माते असून, त्यांच्या तांत्रिक ज्ञानाच्या माध्यमातून सक्षमपणे विविध कामे पूर्ण केली जातात.”
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. भारताच्या अभियांत्रिकी क्षेत्रात सर विश्वेश्वरय्या यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचे स्मरण करून उपस्थित अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता (बांधकाम) दिपाली घोरपडे यांनी केले. यावेळी त्यांनी अभियंता दिनाचे महत्त्व सांगताना भारतरत्न डाॅ. सर मो. वि. यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील थोर योगदानाचा परिचय करून दिला. 'Public service with professional skills' असा दृष्टीकोन ठेवून नविन आव्हानांचे संधित रुपांतर करणे, ही खरी अभियंत्याची कसोटी आहे.
अभियांत्रिकी क्षेत्रात सातत्याने नवनवीन तांत्रिक बदल होत आहेत. त्यामुळे अभियंत्यांनी नवीन तंत्रज्ञान, तांत्रिक पद्धती व बदलत्या कार्यप्रणालीबाबत सातत्याने प्रशिक्षण घेऊन स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांना त्यांच्या सेवेत तांत्रिकदृष्ट्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, विशेषतः कनिष्ठ अभियंत्यांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकासकामांची वेळोवेळी तपासणी करून कामाची गुणवत्ता, तांत्रिक निकष आणि निर्धारित प्रक्रियेचे पालन याबाबत दक्षता घेण्याचे मार्गदर्शनही त्यांनी केले.
कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या अभियंत्यांनी विकासकामांमध्ये बजावलेल्या भूमिकेचा गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, सिंचन, रस्ते, शासकीय इमारती तसेच विविध विकासकामांच्या नियोजन व अंमलबजावणीत अभियंत्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यकारिणी सल्लागार इंजिनिअर मंगेश मसूरकर यांनी मनोगत व्यक्त करताना उपस्थितांचे आभार मानले तसेच सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग संतोष शिरसाट, कार्यकारी अभियंता बांधकाम दिपाली घोरपडे, कार्यकारी अभियंता युवराज कांबळे, उपकार्यकारी अभियंता स्वराली विसे तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या शिर्के यांनी केले, तर इंजिनिअर विजय सुलताने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
