Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

गणेशोत्सवासाठी गावी जात असाल तर घराची काळजी घ्या; मुंब्रा पोलिसांचे नागरिकांना आवाहन

 

दिवा परिसरातील नागरिकांनी घर बंद करून बाहेरगावी जाण्यापूर्वी खबरदारी घेण्याचे आवाहन

 घरफोडी व चोरीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून सुरक्षा सूचना

दिवा : गणेशोत्सवानिमित्त दिवा परिसरातील अनेक नागरिक आपल्या कुटुंबीयांसह मूळ गावी किंवा कोकणात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक घरे काही दिवस बंद राहणार असून, या कालावधीत घरफोडी व चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुंब्रा पोलिसांनी केले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात नागरिक मोठ्या संख्येने बाहेरगावी जात असल्याने बंद घरांवर चोरट्यांची नजर राहण्याची शक्यता असते. त्यामुळे घरामध्ये सोन्याचे दागिने, मौल्यवान वस्तू, मोठी रोख रक्कम अथवा इतर किंमती वस्तू ठेवू नयेत. मौल्यवान वस्तू शक्य असल्यास सुरक्षित ठिकाणी किंवा बँक लॉकरमध्ये ठेवाव्यात, असे पोलिसांनी सांगितले आहे.

घर बंद करून बाहेरगावी जाताना मुख्य दरवाजा, खिडक्या, बाल्कनी तसेच घरातील इतर प्रवेशद्वारे व्यवस्थित लॉक करावीत. घरामध्ये CCTV यंत्रणा असल्यास ती सुरू असल्याची खात्री करावी. तसेच आपण अनेक दिवस घराबाहेर राहणार असल्याची माहिती सोशल मीडिया अथवा सार्वजनिक माध्यमांवर शेअर करू नये.

घर बंद करून जाताना शेजारी किंवा विश्वासू व्यक्तीला याची माहिती देऊन घरावर लक्ष ठेवण्याची विनंती करावी. शक्य असल्यास घरातील दिवे टायमरच्या माध्यमातून ठराविक वेळेत सुरू-बंद होतील, अशी व्यवस्था करावी. घराची चावी किंवा घरासंदर्भातील संवेदनशील माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा हालचाल आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. ‘सावधगिरी हीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली’ असून, गणेशोत्सव आनंदात आणि सुरक्षित वातावरणात साजरा करण्यासाठी मुंब्रा पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |