Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

ठाणे जिल्ह्यात 21 ठिकाणी होणार रोजगार मेळावे ; 'रोजगार महाकुंभ'; 99 कंपन्यांमध्ये 7,707 पदांची महाभरती

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन आढावा बैठक संपन्न

ठाणे,दि.22  :- ठाणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या 'पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाच्या' माध्यमातून उपलब्ध रिक्त पदांच्या तुलनेत अधिकाधिक नोकरी इच्छुक उमेदवारांची नोंदणी करून हा मेळावा अधिक व्यापक स्वरूपात यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज समिती सभागृहात पार पाडलेल्या आढावा बैठकीत दिल्या.

जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता आणि नाविन्यता कार्यकारी समितीची, तसेच आगामी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाच्या नियोजनाबाबतची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथील समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, जिल्हा उद्योग केंद्राच्या उपायुक्त सोनाली देवरे, कामगार विभाग, एमआयडीसी (MIDC), ठाणे महानगरपालिका, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी, विविध संस्था व रोजगार मेळावा समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी सांगितले की, ठाणे जिल्ह्यात यापूर्वी 16 रोजगार मेळावा स्थळे निश्चित करण्यात आली होती. मात्र, शासनाच्या नवीन निर्देशानुसार आणखी 5 नवीन स्थळांचा समावेश करण्यात आला असून, आता जिल्ह्यात एकूण 21 ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये नवी मुंबई बेलापूर, भिवंडी, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, शहापूर, मुरबाड, वाशी, नेरूळ आदी विविध भागांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांतील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत 99 नियोक्त्यांनी (कंपन्यांनी) नोंदणी केली असून, त्यांच्याकडून एकूण 7 हजार 707 रिक्त पदे अधिसूचित करण्यात आली आहेत. तसेच आतापर्यंत 7 हजार 308 नोकरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत नियोक्त्यांकडील रिक्त पदांची अद्ययावत माहिती संकलित करून ती इंडस्ट्री असोसिएशनला उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. त्याद्वारे संबंधित उद्योग व नियोक्त्यांशी समन्वय साधून अधिकाधिक रिक्त पदे रोजगार मेळाव्यासाठी उपलब्ध करून घेण्यावर भर देण्यात येणार आहे.

उपलब्ध रिक्त पदांच्या तुलनेत उमेदवारांची संख्या वाढविण्यासाठी सर्व महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), पॉलिटेक्निक, कौशल्य विकास संस्था तसेच विविध संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती व मोबिलायझेशन (उमेडवारांची जमवाजमव) करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच रोजगार महाकुंभाची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वे स्थानके, बस स्थानके तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असलेल्या प्रमुख ठिकाणी फ्लेक्स, बॅनर व प्रसिद्धी साहित्य लावून व्यापक प्रचार-प्रसिद्धी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

रोजगार मेळाव्यापूर्वी उमेदवारांना रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने पूर्व रोजगारक्षमता प्रशिक्षणाचे दोन सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. पहिले प्रशिक्षण सत्र दि. 7 ते 10 सप्टेंबर 2026 या कालावधीत घेण्यात आले असून, त्यामध्ये 756 उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तर दुसरे प्रशिक्षण सत्र दि. 21 ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत सध्या सुरू आहे.

हा रोजगार महाकुंभ यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित विभाग, शैक्षणिक संस्था, कौशल्य विकास संस्था, उद्योग संघटना, नियोक्ते व इतर यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

बैठकीच्या शेवटी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त तथा सदस्य सचिव रविंद्र मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |