Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

दिव्यात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट; “सामान्यांवर कारवाई आणि सत्ताधाऱ्यांना अभय का?”; ॲड. रोहिदास मुंडे यांचा ठाणे महापालिका आयुक्तांना सवाल

दिवा : दिवा शहरातील विकास म्हात्रे गेट, संतोषनगर आणि दादूसनगर परिसरात सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामांवरून राजकीय वातावरण तापले आहे. या परिसरातील अनधिकृत बांधकामांची तातडीने पाहणी करून नियमबाह्य बांधकामांवर कारवाई करावी, तसेच संबंधित बांधकामांसाठी जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी ठाणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

दिवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक दीपक जाधव यांची नियुक्ती झाल्यानंतर संबंधित परिसरात अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढल्याचा आरोप ॲड. मुंडे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून त्यांच्या कार्यक्षेत्रातील बांधकामांबाबत प्रशासनाने जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, काही बांधकाम व्यावसायिकांमध्ये अनधिकृत बांधकामांबाबत कथितरीत्या “बांधकाम बिनधास्त करा, कोणी आले तर मी बघून घेईन,” अशा स्वरूपाची चर्चा असल्याचा दावा ॲड. मुंडे यांनी केला आहे. या कथित वक्तव्यामागील सत्यता प्रशासनाने निष्पक्षपणे तपासावी आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

“सामान्यांवर कारवाई, मग सत्ताधाऱ्यांना अभय का?”

“दिव्यात एखादा सामान्य नागरिक अनधिकृत बांधकाम करत असेल तर महापालिका तत्काळ कारवाई करते. मात्र, राजकीय पदावर असलेल्या व्यक्तींच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा आरोप होत असताना प्रशासन गप्प का?” असा सवाल ॲड. रोहिदास मुंडे यांनी उपस्थित केला.

प्रभाग समिती अध्यक्ष हे स्थानिक प्रशासनाच्या कामकाजावर देखरेख ठेवणाऱ्या महत्त्वाच्या पदावर असल्याने त्यांच्या कार्यक्षेत्रात नियमबाह्य बांधकामे सुरू असल्यास प्रशासनाने वस्तुस्थितीची चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे.

“अनधिकृत बांधकाम करणारा कोणत्याही पक्षाचा असो, कायद्यापुढे सर्व समान असले पाहिजेत”

“अनधिकृत बांधकाम करणारा कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही पदावरचा असो किंवा कोणाच्याही राजकीय जवळचा असो, कायद्यापुढे सर्व समान असले पाहिजेत. प्रशासनाने केवळ सामान्य नागरिकांवर कारवाई न करता राजकीय प्रभाव असलेल्या व्यक्ती किंवा नगरसेवकांशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या बांधकामांचीही निष्पक्ष चौकशी करावी,” अशी भूमिका ॲड. मुंडे यांनी मांडली.

विकास म्हात्रे गेट, संतोषनगर आणि दादूसनगर परिसरातील सर्व बांधकामांची तातडीने पाहणी करून संबंधित कागदपत्रे, बांधकाम परवानग्या, मंजूर नकाशे आणि इतर आवश्यक बाबींची तपासणी करावी. नियमबाह्य बांधकामे आढळल्यास ती नियमानुसार निष्कासित करून संबंधित जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

“अनधिकृत बांधकामांना कोणाचे संरक्षण?”

ठाणे महापालिका आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दिव्यातील कथित अनधिकृत बांधकामांना कोणाचे संरक्षण आहे, याची वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी. तसेच चौकशीत दोष आढळल्यास संबंधित सर्व व्यक्तींवर, पद किंवा राजकीय संबंधांचा विचार न करता, नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ॲड. रोहिदास मुंडे यांनी केली आहे.

दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित दिवा प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक दीपक जाधव अथवा ठाणे महापालिका प्रशासनाची भूमिका समोर आलेली नसून, त्यांची बाजू उपलब्ध झाल्यास तीही प्रसिद्ध केली जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |