या विशेष शिबिरांचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आवाहन
ठाणे : नवमतदार तसेच अन्यथा पात्र असून प्रारुप मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांना मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करणे, मतदार यादीमधील अस्तित्वात असलेल्या नोंदीमध्ये सुधारणा करणे तसेच यादीतील नावाची वगळणी करणे यासाठी दावे व हरकतींचा कालावधी दिनांक 31 ऑगस्ट, 2026 ते 30 सप्टेंबर, 2026 असा आहे. याच कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजित करण्यात आलेले आहे. जिल्हयातील सर्व पात्र नागरिकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेण्यासाठी तसेच आपले नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, जिल्हयातील 18 विधानसभा मतदार संघामध्ये मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 31 ऑगस्ट, 2026 ते 30 सप्टेंबर, 2026 हा कालावधी दावे व हरकती सादर करण्याकरीता निश्चित करण्यात आलेला आहे.
गैरहजर / स्थलांतरित किंवा इतर कारणामुळे मतदारयादीत नाव समाविष्ट करु न शकलेल्या मतदारांना त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणांहून मतदार यादीमध्ये नव्याने नाव अंतर्भूत करण्यास दावे व हरकतीच्या कालावधीमध्ये संधी उपलब्ध झालेली आहे. त्याचप्रमाणे ऑक्टोबर, 2024 नंतर मतदार यादी पुनरिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात आला नसल्याने दिनांक 01.10.2024 नंतर 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविता आले नव्हते. आता, दि.01.10.2026 रोजी किंवा त्या पूर्वी 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नवमतदारांना मतदारयादीमध्ये नाव अंतर्भूत करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. सबब, नवमतदार तसेच अन्यथा पात्र असून प्रारुप मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांना मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करणे, मतदार यादीमधील अस्तित्वात असलेल्या नोंदीमध्ये सुधारणा करणे तसेच यादीतील नावाची वगळणी करणे यासाठी दावे व हरकतींचा कालावधी दिनांक 31 ऑगस्ट, 2026 ते 30 सप्टेंबर, 2026 असा आहे. याच कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजित करण्यात आलेले आहे.
ठाणे जिल्हयातील सर्व विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर शनिवार, दि. 19 व रविवार, 20 सप्टेंबर 2026 तसेच शनिवार, दि. 26 व रविवार, दि. 27 सप्टेंबर 2026 या दिवशी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आलेली आहेत. या कालावधीत सकाळी 10.00 ते संध्याकाळी 06.00 वाजेपर्यंत दावे व हरकती मतदारांना दाखल करता येतील. (नाव सामाविष्ट करण्यासाठी नमूना क्र. 6, दुरूस्ती साठी नमूना 8, वगळणीसाठी नमूना 7) (त्यासोबत घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रासह) या शिबिरांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याबरोबर मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) यांना उपस्थित राहण्याच्या सूचना संबंधित राजकीय पक्षांमार्फत देण्यात आल्या आहेत. तसेच सदर विशेष शिबिरांमध्ये महिला तसेच दिव्यांगांच्या समावेशनासाठी विशेष प्राधान्य देण्यात आलेले आहे.
जिल्हयातील सर्व पात्र नागरिकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेण्यासाठी तसेच आपले नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
