· राम गणेश गडकरी रंगायतन येथे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम;
· विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ‘ठाणे भूषण’, ‘ठाणे गौरव’ व ‘ठाणे गुणीजन’ व ‘विशेष’ पुरस्काराने होणार गौरव
ठाणे, (08) : ठाणे महानगरपालिकेचा ४४ वा वर्धापन दिन १ ऑक्टोबर २०२६ रोजी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला असून, या निमित्ताने ठाणे शहराच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नागरिकांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिली.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन, विविध उपक्रम, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, उथळसर प्रभाग समिती सभापती नारायण पवार, वागळे प्रभाग समिती अध्यक्षा एकता भोईर, कळवा प्रभाग समिती सभापती विजया लासे, दिवा प्रभाग समिती सभापती दीपक जाधव, नगरसेवक रमाकांत मढवी, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर आदी उपस्थित होते.
महापालिका भवनात ध्वजवंदन
ठाणे महानगरपालिकेच्या 44 व्या वर्धापन दिनानिमित्त 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 वाजता महापालिका भवन येथे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते महापालिका ध्वजास ध्वजवंदन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानंतर महापालिकेच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजासोबतच शहराच्या विकासामध्ये अधिकारी आणि कर्मचारी बजावत असलेल्या भूमिकेची दखल घेत त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध क्षेत्रातील ठाणेकरांचा होणार गौरव
ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचा सन्मान. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, साहित्य, उद्योग, समाजसेवा यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ठाणेकरांना ‘ठाणे भूषण’, ‘ठाणे गौरव’ आणि ‘ठाणे गुणीजन’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून ठाणे शहराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंचाही ‘विशेष’ पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. शहराच्या विकासात आणि सामाजिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी नागरिकांनी अर्ज करण्याचे आवाहन
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ठाणेकरांनी या पुरस्कारांसाठी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले आहे. पुरस्कारासाठी अर्ज करताना संबंधित नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसहित स्थानिक नगरसेवकांच्या शिफारशीसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. नागरिकांनी आपले अर्ज दोन प्रतींमध्ये महापौर कार्यालय, पहिला मजला, ठाणे महानगरपालिका, पाचपाखाडी, ठाणे येथे सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १८ सप्टेंबर २०२६ आहे. या मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पुरस्कारासाठी अंतिम निर्णय हा गठीत करण्यात येणाऱ्या समितीचा राहिल असेही महापौरांनी नमूद केले आहे.
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या नियोजनावर चर्चा करण्यात आली असून, संबंधित विभागांना जबाबदाऱ्या सोपविण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.

