Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई; सोनसाखळी चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल !

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या आरोपीला अटक

 २ लाख ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत

मुंब्रा : महिलांच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात मुंब्रा पोलिसांच्या दिवा तपास पथकाला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण २ लाख ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून, सोनसाखळी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सौ. सागरिका अमित दोलुई (वय ३०) या आपल्या मुलीला क्लासला सोडण्यासाठी जात असताना, त्यांच्या मागून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील ९ ग्रॅम वजनाची, १ लाख १६ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून चोरी केली. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७३८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या तपासातून अजय गौतम खराटकर (वय ३८, रा. दिवा पश्चिम, ठाणे) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तपासादरम्यान आरोपीने यापूर्वीही एका महिलेची सोनसाखळी हिसकावल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात ८ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा क्रमांक १७६०/२०२६ अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दोन्ही गुन्ह्यांतील चोरीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. त्यामध्ये १ लाख १६ हजार रुपये किमतीची ९ ग्रॅम वजनाची सोनसाखळी आणि ८४ हजार ५०० रुपये किमतीचे ६.५०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने यांचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण २ लाख ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

ही कारवाई ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सहआयुक्त पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) अशोक दुधे , पोलीस उपआयुक्त बाळासाहेब पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक शरद कुंभार, पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी हुलगे तसेच पोलीस हवालदार गोविंद मुंडे, सचिन रांजणे, पोलीस नाईक जयेश तामोरे, पोलीस शिपाई महेंद्र बर्फ, प्रवीण पाटील, वसीम तडवी, शिरीष मोरे, प्रकाश गडदे, गणेश धुमाळ, महेश जाधव आणि सागर सपकाळे यांनी सहभाग घेतला.

महिलांनी सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन

महिलांनी घराबाहेर पडताना अंगावरील मौल्यवान दागिन्यांची काळजी घ्यावी. नेहमीच्या रस्त्याने प्रवास करताना कोणी वारंवार पाठलाग करत आहे का, याकडे लक्ष द्यावे. संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास जवळच्या पोलीस ठाण्याला त्वरित माहिती द्यावी.

तसेच बाजारपेठ किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना शक्यतो मौल्यवान दागिने परिधान करणे टाळावे, असे आवाहन मुंब्रा पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

या कारवाईमुळे दिवा आणि मुंब्रा परिसरातील सोनसाखळी चोरीच्या दोन गुन्ह्यांचा तपास पुढे आला असून, नागरिकांनी दागिने वापरताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |