Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

‘चला शाळेत जाऊया’ अभियानाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची कोकणातील शाळांना भेट; शैक्षणिक गुणवत्ता व पायाभूत सुविधांचा आढावा

मुंबई, दि. १० : राज्यातील शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, अध्यापन-अध्ययन प्रक्रिया तसेच विविध शासकीय शैक्षणिक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘चला शाळेत जाऊया’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मंत्री, वरिष्ठ अधिकारी, पालक अधिकारी आणि जिल्हा नोडल अधिकारी यांच्या प्रत्यक्ष शाळा भेटींमुळे शालेय प्रशासनातील सकारात्मक बाबी, अडचणी आणि आवश्यक सुधारणांच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होत आहे.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची कोकणातील शाळांना भेट

मंत्री भुसे यांनी अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान कोकण विभागातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन शैक्षणिक गुणवत्ता व पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पांडुरंगशेठ पडते, पडतेवाडी तसेच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, खारेपाटण क्रमांक १, रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा, पानवल, होरंबेवाडी आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा झरेवाडी, रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा आदिवासीवाडी तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, झिरड येथे भेट देऊन शाळांमधील शैक्षणिक व भौतिक सुविधांची पाहणी केली. या भेटींदरम्यान विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन व अध्ययन कौशल्यांचा आढावा घेण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड झालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शालेय शिक्षण विभागाचे ‘राष्ट्र प्रथम’ हे ब्रीदवाक्य केंद्रस्थानी ठेवून पायाभूत सुविधांसोबतच गुणवत्तापूर्ण, आनंददायी आणि संस्कारक्षम शिक्षणाला प्राधान्य देण्याचे निर्देश मंत्री भुसे यांनी दिले.

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना, सामाजिक मूल्ये आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षक व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे मंत्री भुसे यांनी यावेळी नमूद केले. शाळांमधील निर्लेखनास पात्र असलेल्या साहित्याचे नियमानुसार तातडीने निर्लेखन करून शाळा परिसर स्वच्छ व सुव्यवस्थित ठेवण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या.

मंत्री भुसे यांच्या निर्देशांनुसार शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन शैक्षणिक व प्रशासकीय बाबींचा आढावा घेण्यासाठी ५ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध टप्प्यांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी विविध जिल्ह्यांकरिता शालेय शिक्षण विभागातील सहसंचालक व उपसंचालक यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शाळा भेटीदरम्यान विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, वाचन व लेखन कौशल्ये, विद्यार्थ्यांची उपस्थिती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छतागृहांची स्थिती, वर्गखोल्या, शाळा परिसराची स्वच्छता, क्रीडांगण, संरक्षक भिंत, वीजपुरवठा, आवश्यक फर्निचर, डिजिटल व ई-सुविधा, विद्यार्थ्यांचे गणवेश तसेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पोषण आहाराची गुणवत्ता व वितरण यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत आहे. शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम तसेच उपलब्ध सर्वेक्षण अहवालांच्या आधारे आवश्यक सुधारात्मक उपाययोजनांचाही आढावा घेण्यात येत आहे.

‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या माध्यमातून प्रशासन थेट शाळेपर्यंत पोहोचत असून, प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुरक्षित शालेय वातावरण आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना सुनिश्चित केल्या जात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |