Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई २ कोटी रुपयांचे बेकायदेशीर अन्न पदार्थ जप्त

DXP Ventures India Pvt. Ltd. चा परवाना निलंबित

ठाणे,दि.19 : भिवंडी ग्रामीण, ठाणे येथे अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे विभाग-10 चे सहायक आयुक्त योगेश ढाणे यांना प्राप्त विशिष्ट गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 18 व 19 नोव्हेंबर 2026 रोजी मे. DXP Ventures India Pvt. Ltd. यांच्या गोदाम/आस्थापनेवर धडक तपासणी व छापेमारी करण्यात आली. डॉ. तुकाराम मुंढे, आयुक्त (अन्न सुरक्षा), महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगवरील अत्यंत महत्त्वाच्या माहितीमध्ये कथित फेरफार करण्याची गंभीर बाब प्राथमिक तपासात समोर आली. आयात अन्नपदार्थांवरील मूळ उत्पादन तारीख, कालबाह्यता तारीख तसेच कमाल किरकोळ विक्री किंमत (MRP) पुसून/ मिटवून टाकण्यासाठी थिनर या रासायनिक पदार्थाचा वापर होत होता. त्यानंतर सुधारित तारीख व MRP पुन्हा छापण्याची अथवा स्टॅम्पिंग करण्यात येत होते. घटनास्थळी थिनर, तारीख व MRP छापण्यासाठी वापरली जाणारी स्टॅम्पिंग यंत्रसामग्री आणि संबंधित साहित्य आढळल्याने अन्नपदार्थांच्या लेबलवरील अनिवार्य घोषणांमध्ये अनधिकृत फेरफार झाल्याचे आढळून आले.

अशा प्रकारे उत्पादनाची खरी ओळख, शेल्फ-लाईफ, कालबाह्यता स्थिती आणि ग्राहकाने किंमत व उत्पादनाविषयी घेतलेला निर्णय यांवर परिणाम होऊ शकतो. उत्पादन तारीख किंवा कालबाह्यता तारीख बदलल्यास ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता तर असतेच; शिवाय अन्नपदार्थांच्या मागोवा घेणे (traceability), साठा नियंत्रण, तक्रारींची चौकशी आणि गरज भासल्यास बाजारातून उत्पादन परत मागविणे (recall) यांसारख्या महत्त्वाच्या अन्नसुरक्षा प्रक्रियांनाही बाधा पोहोचू शकते. प्रशासन या प्रकरणातील प्रत्येक बाबीची कागदपत्रे, साठा, लेबल प्रिंटींग/स्टॅम्पिंग प्रक्रिया व संबंधित पुरावा यांच्या आधारे पुढील तपास करीत आहे.

कारवाईदरम्यान स्पार्कलिंग वॉटर, एनर्जी ड्रिंक, सौदी कॉकटेल, सोडा, प्रीमियम सोडा वॉटर, जिंजर सोडा तसेच A2 बिलोना देशी तूप यांसह एकूण 14 प्रकारचे अन्नपदार्थ मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले. उपलब्ध जप्ती तपशीलानुसार या साठ्याचे घोषित एकूण मूल्य रु.2,06,21,243/- (रुपये दोन कोटी सहा लाख एकवीस हजार दोनशे त्रेचाळीस) असे आहे. जप्त मालामध्ये विविध बँडचे पेय पदार्थ आणि देशी तुपाचे प्रकार समाविष्ट असून, संबंधित साठा नियामक नियंत्रणाखाली ठेवण्यात आला आहे. जप्त केलेल्या अन्नपदार्थांची संख्या, उत्पादननिहाय तपशील, पॅकिंग, लेबलवरील घोषणांमधील स्थिती आणि संबंधित नोंदींची पुढील पडताळणी करण्यात येत आहे.

प्राथमिक निरीक्षणांनुसार सदर प्रकरणात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 मधील कलम 23,26 व 27 संदर्भातील अनुपालनाचा प्रश्न निर्माण झाला असून, इतर लागू तरतुदी व नियम/नियमावलींच्या अनुषंगानेही कायदेशीर छाननी करण्यात येत आहे. तपासातील गंभीर बाबी, साठ्याची स्थिती आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपायांचा विचार करून, सक्षम परवाना प्राधिकारी तथा सहायक आयुक्त योगेश ढाणे यांनी आज दिनांक 19.11.2026 रोजी मे. DXP Ventures India Pvt. Ltd. यांचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित केला आहे. परवाना निलंबनाची कारवाई ही सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणासाठी आणि तपास पूर्ण होईपर्यंत संभाव्य जोखीम रोखण्यासाठी करण्यात आलेली प्रशासकीय प्रतिबंधात्मक कारवाई आहे.

या धडक कारवाईत वाय. एच. ढाणे, सहायक आयुक्त (अन्न), ठाणे विभाग-10 व सह आयुक्त (अन्न) डॉ. सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी के. वाय. चिपळूणकर व ए. व्ही. कांडेलकर यांनी सहभाग घेतला. अन्न व औषध प्रशासन ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही कृतीला गंभीरतेने घेत असून, अन्नपदार्थांवरील अनिवार्य माहितीमध्ये फेरफार, कालबाहा किंवा संशयास्पद अन्नपदार्थांचा व्यापार, तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन याविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करणार आहे. नागरिकांनी संशयास्पद अन्नपदार्थ, चुकीचे लेबलिंग किंवा अन्नसुरक्षेशी संबंधित बाबी आढळल्यास प्रशासनाकडे माहिती द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, ठाणे सह आयुक्त (अन्न) (कोकण विभाग) यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |