डोंबिवली ( शंकर जाधव) : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवार 25 तारखेला रंगपंचमीदिनी डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेत शिवसैनिकांबरोबर सण साजरा केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार यांनी बाळासाहेब ठाकरेंचा भगवा रंग, हिंदुत्वाचा भगवा रंग, प्रभू रामाचा भगवा रंग पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करत असल्याचे सांगितले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, भाऊसाहेब चौधरी, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, अभिजित दरेकर, संतोष चव्हाण, सागर बापट, रवी पाटील,सागर जेधे,सागर बापट, प्रकाश माने,अर्जुन पाटील, महेश पाटील, लता पाटील आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.पुणे येथील सुनील कांतीलाल शहा, रमेश रामचंद्र ताम्हाणे यांनी यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना अयोध्येतील प्रभू श्रीराममंदिराची प्रतिकृती भेट दिली.
कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उत्सवात सहभाग घेतला आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. डॉ.श्रीकांत शिंदे म्हणाले की, आज धुळवडीच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज सगळेजण वेगवेगळ्या रंगात रंगले आहेत. एका रंगात भारत रंगला आहे तो म्हणजे भगवा रंग. भगव्या रंगात लोक रंगून गेले आहेत. धुळवडीच्या सगळ्यांना शुभेच्छा. रुसवे-फुगवे बाजूला ठेवण्याचा आजचा दिवस. एकमेकांबरोबर चांगल्या प्रकारे खेळली पाहिजे. विरोधक सत्ताधारीही या दिवशी एकत्र येतात. कटुता दूर करणारा हा सण आहे. काही लोकांनी भगवा रंग सोडला आहे. ज्यांनी भगवा रंग सोडून जो रंग धारण केला आहे तो त्यांना लखलाभ असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला. बाळासाहेब ठाकरेंचा भगवा रंग, हिंदुत्वाचा भगवा रंग, प्रभू रामाचा भगवा रंग पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतो आहोत. असंही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.