दिवा ( विनोद वास्कर ) :- ओरिजनल शिवसेनेत असताना श्रीकांत शिंदे यांना धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी गयावया करावी लागत नव्हती. मात्र आता भाजपचे गल्लीतले पदाधिकारी सुद्धा श्रीकांत शिंदे यांना कमळाच्या चिन्हावर लढायला सांगत आहेत. याचाच अर्थ ठाकरेंशी गद्दारी करून चोरलेल्या धनुष्यबाणावर श्रीकांत शिंदे हे निवडणूक जिंकणार नाहीत याची खात्री पटल्याने भाजपचे पदाधिकारी त्यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढायला सांगत असल्याचा घणाघात ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केला आहे.
दिवा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना कल्याण लोकसभेचा उमेदवार हा कमळ चिन्हावर उभा करावा अशा आशयाचे पत्र दिले होते. यावरून शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या दिवा पदाधिकाऱ्यांवर आरोप करत, श्रीकांत शिंदे धनुष्यबाण चिन्हावर लढणार असे उत्तर दिले. या दोघांचाही समाचार घेताना ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे की, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या गल्लीतील पदाधिकाऱ्यांकडे आम्हाला धनुष्यबाण चिन्हावर लढायला द्या अशा प्रकारची गयावया करावी लागत आहे. तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना श्रीकांत शिंदे हे धनुष्यबाण चिन्हावर विजयी होणार नाहीत याची खात्री पाटल्याने त्यांना कमळ चिन्हावर उतरवा किंवा कमळ चिन्हाचा उमेदवार कल्याण लोकसभेत द्या अशी मागणी पक्षाकडे करावी लागत आहे. एकंदरीत गद्दारी करून बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी व मातोश्री कुटुंबाशी बेइमानी करणाऱ्यांना आता पराभवाची भीती वाटू लागल्याने नेमकं कोणतं चिन्ह हाती घेऊ असा प्रश्न पडला आहे, असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी लगावला आहे.
जेव्हा श्रीकांत शिंदे हे ओरिजनल शिवसेनेत होते तेव्हा मातोश्रीवरून आदेश निघाला की त्यांची उमेदवारी आणि विजय निश्चित होता. आता पक्ष आणि चिन्ह श्रीकांत शिंदे यांचे वडील एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असतानाही कल्याण लोकसभेतून कोणत्या चिन्हावर ते लढले पाहिजेत याबाबतचा निर्णय त्यांच्याच युतीत होत नसल्याने त्यांच्यावर केवीळवाणी परिस्थिती आल्याचा टोला रोहिदास मुंडे यांनी लगावला आहे.