Type Here to Get Search Results !

पहिल्या टप्प्यात १.४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

 


लोकसभा निवडणूक २०२४: रामटेक मतदारसंघात सर्वाधिक नवमतदार; शुक्रवारी मतदान   

मुंबई, दि. १७ :लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नवमतदारांची संख्या लक्षणीय असून यंदा 18-19 या वयोगटातील 1 लाख 41 हजार 457 नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नवमतदारांनी मतदान करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदारसंघामध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. मतदान केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून दुर्गम भागातील मतदान केंद्रापर्यंत आवश्यक मतदान साहित्य पोहोच करण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदान केंद्रावर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरसह आवश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात नवमतदारांनी मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करुन घेतली आहे.

18-19 वयोगटातील सर्वाधिक नवमतदार रामटेक मतदारसंघात आहेत. त्यापाठोपाठ भंडारा-गोंदिया या मतदारसंघात आहेत. रामटेक मतदारसंघात 31,725, भंडारा-गोंदिया 31,353, नागपूर 29,910, चंद्रपूर 24,443 आणि गडचिरोली-चिमुर या मतदारसंघात 24,026 इतके नवमतदार आहेत. यासह 20-29 वयोगटांतील सर्वाधिक मतदारही रामटेक मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात 3,83,276,  भंडारा-गोंदिया 3,66,570, चंद्रपूर 3,42,787, नागपूर 3,37,961 आणि गडचिरोली-चिमुर या मतदारसंघात 3,28,735 इतके मतदार आहेत.

30-39 वयोगटातील सर्वाधिक मतदार हे नागपूर मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात 5,06,372, रामटेक 4,90,339, चंद्रपूर 4,25,829, भंडारा-गोंदिया 3,99,115 आणि गडचिरोली-चिमुर या मतदारसंघात 3,56,921 इतके मतदार आहेत.

पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक मतदार सर्वाधिक नागपूर मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात 70,698 इतके मतदार आहेत. त्यापाठोपाठ रामटेक 46,413, भंडारा-गोंदिया 38,269, चंद्रपुर 37,480 आणि गडचिरोली-चिमुर 33,559 असे एकूण 2,26,419 ज्येष्ठ  मतदार आहेत. येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून सर्व मतदारांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies