डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण लोकसभा मतदार क्षेत्रात कुठलाच विकास झाला नाही. मेट्रोसाठी डिव्हाइडर्स मध्ये खड्डे खोदून पिलर उभा करण्यात आला पण अशा डिव्हाइडर्स मध्ये मेट्रोचा पिलर उभा राहू शकतो का ? येथे कुठलाच विकास झाला नाही, फक्त बॅनरबाजी होत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दत्तक घेतलेल्या गावात पिण्यासाठी पाणी नाही. आजही महिला डोक्यावर हंडा घेऊन गावोगाव पाण्यासाठी भटकत आहेत. विरोधकांना विकास कुठे दिसतो ? अशी टीका महाविकास आघाडीतील उबाठाच्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांनी मेळाव्यात केली.
मंगळवारी दावडी येथील पाटीदार भवन येथे महाआघाडी तर्फे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी गटनेते गुरुनाथ खोत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश चेचे, धनंजय बोडारे, उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे, रमेश जाधव, शहरप्रमुख शरद पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील, आरपीआय निकाळजे गटाचे जिल्हाध्यक्ष धर्मा वख्ते, आपचे जिल्हाध्यक्ष धनंजय जोगदंड, माजी नगरसेवक संतोष केणे यांच्यासह आघाडीतील महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरेकर पुढे म्हणाल्या, लोकांचा प्रचंड रिस्पॉन्स मिळत असून या वेळेला लोकांना परिवर्तन हवं त्यासाठी लोक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशालीलाच मतदान करणार आहेत. येत्या 13 तारखेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे डोंबिवलीच्या ह.भ.प. संत सावळाराम म्हात्रे महाराज क्रीडा संकुलात सभा घेणार आहेत तर 17 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रमुख शरद पवार हे मुंब्रा कळवा परिसरात सभा घेणार आहेत.या मेळाव्यात उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी लोकांसमोर नेमके काय मुद्दे घेऊन जावे या विषयावर नेते व कार्यकर्त्यात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.