Type Here to Get Search Results !

गिर्यारोहण क्षेत्रात अनेक यशस्वी मोहिमा आखून चाळीस वर्षे युवकांना मार्गदर्शन करणारे डोंबिवलीकर सतीश गायकवाड यांचा सन्मान


डोंबिवली ( शंकर जाधव ) : गिर्यारोहण क्षेत्रात अनेक यशस्वी मोहिमा आखून गेली चाळीस वर्षे युवकांना मार्गदर्शन करणारे डोंबिवलीकर सतीश गायकवाड यांचा ऍडव्हेंचर कॉनक्लेव्ह या कार्यक्रमात त्यांच्या मुलींच्याच हस्ते सन्मान करण्यात आला. मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघात, माउंटन स्पोर्ट्स अकादमीचे नंदू चव्हाण यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


माउंटेनिअर्स असोसिएशन डोंबिवली म्हणजेच मॅड या संस्थेच्या माध्यमातून सतीश गायकवाड यांनी गडकिल्ले, हिमालयीन मोहिमा, साहस शिबिरे यांचे यशस्वी आयोजन, किल्लारी, भुज भूकंप बचाव कार्य, श्रीमलंगगड बचाव मोहीम, रक्तदान शिबिरे, आदिवासी भागात शैक्षणिक साहित्य व फराळ वाटप, साहस प्रदर्शन अशा विविध सामाजिक उपक्रम व माध्यमातून सातत्याने गिर्यारोहण क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल हा सत्कार करण्यात आला. यावेळी दिव्येश मुनी, नंदू चव्हाण, डॉ. प्रीती पटेल, पद्माकर गायकवाड व गिर्यारोहण क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरही उपस्थित होते.


सह्याद्री पर्वत रांगांमधील महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा, म्हणजेच गड किल्ले त्यांचे जतन व संवर्धन यासाठी शासन, गिर्यारोहक व पर्यटक, यांच्या सहकार्यातून व्यापक मोहीम राबवण्याची गरज असल्याचे वास्तव दिवसभर चाललेल्या विविध चर्चा सत्रांतून समोर आले.

यात हौशी वैयक्तिक गिर्यारोहक व संस्था, व्यावसायिक गिर्यारोहक संस्था, आपत्ती व्यवस्थापन व बचाव पथके, गड किल्ले येथील स्थानिक रहिवाशी, वाटाडे, दुर्ग संवर्धनसाठी कार्यरत संस्था अशा गिर्यारोहण क्षेत्रातील

अनेक अनुभवी प्रतिनिधींकडून, व्यापक व मुद्देसूद चर्चा आणि सादरीकरण माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. गड-किल्ल्यांवर होणारी गर्दी, अपघात, कचरा व्यवस्थापन, नवख्या लोकांची धंदेवाईकता इत्यादि समस्यांवर आपली मत मांडताना मान्यवरांनी ऐतिहासिक मूल्यांचे जतन करण्यासाठी काही सन्माननीय तोडगे सुचवले. गिर्यारोहण क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा त्यांच्या निरपेक्ष योगदानाबद्दल सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies