22 लाखांचे दागिने जप्त
डोंबिवली ( शंकर जाधव ) : घरफोडी आणि लुटमार करणाऱ्या दोन चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातून अटक केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,चिंटू चौधरी निषाद आणि राजेश उर्फ बबलू बनारसी कहार असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल म्हस्के यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीसनिरीक्षक संपत फडोळ, प्रशांत आंधळे यांचे पथक उत्तर प्रदेशला रवाना झाले. पोलिसांनी दोघांनाही अटक करून डोंबिवलीत आणले.
या तपासात पोलिसांनी डोंबिवलीतील घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आणले. त्यानंतर पोलीस पथकाने आरोपीच्या ताब्यातून 22 लाख 77 हजार 800 रुपये किमतीचे 325.4 ग्रॅम दागिने जप्त केले. राजेश उर्फ बबलू याच्यावर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात १३ गुन्हे दाखल आहेत. चिंटू निषाद याच्यावर घरफोडीचे ७ गुन्हे दाखल आहेत. मुंबईतील घाटकोपर पोलिस आणि ठाण्याचे कासारवडवली पोलिस या दोन चोरट्यांचा शोध घेत होते.