डोंबिवली ( शंकर जाधव ) : आपल्याला अखंड भारताचे स्वप्न साकार करायचे असेल तर शिवराज्याभिषेकाची व त्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची आठवण ठेवावी लागेल असे प्रतिपादन प्रमुख वक्ते शिक्षक प्रशांत शिरुडे यांनी डोंबिवलीतील स्व. संघ शाखेच्या वतीने हिंदू साम्राज्य दिन श्री शिवराज्याभिषेक दिन उत्सवात केले.
ज्येष्ठ शु. त्रयोदशी शके १९४६ म्हणजेच २० जून २०२४ रोजी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकास ३५१ वर्षे पूर्ण झाले. रा. स्व. संघ उत्सवातील हा दूसरा उत्सव असून समर्थनगर डोंबिवली पूर्व च्या दत्तनगर वस्तीचा उत्सव शास्त्री हॉल येथे सायंकाळी ६ ते ७ या वेळेत संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली.अमृतवचन सतीश जोशी यांनी सांगितले. 'पृथ्वीवरती द्वाही फिरली, शिवरायांच्या अभिषेकाची शिवराया हा राजा झाला सफल जाहली इच्छा प्रभूची' या सांघिक गीतानंतर कार्यवाह करमरकर यांनी प्रमुख वक्ते शिक्षक प्रशांत शिरुडे यांचा परिचय करून दिला. त्यानंतर अरुण केतकर यांनी वैयक्तिक गीत - 'युगायुगातील हे सिंहासन पुन्हा जाहले सचेतन' सादर केले.
कार्यक्रमाचे वक्ते प्रशांत शिरुडे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवरायांचा ३५१ वर्षानंतरही राज्याभिषेकाचे महत्त्व आजच्या परिस्थतीत समजून घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटे छाटली, पन्हाळगडाहून विशाळगडाकडे जातांना बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाने घोडखिंड पावनखिंड झाली. आग्र्याहून सुटका करून घेतल्यावर गेलेले सर्व किल्ले मोगलांकडून परत घेतले. एवढेच शिवबांचे कर्तृत्व नाही तर प्रत्येक मोहिमेत संयम, योग्य निर्णय, चपळता, अतुलनीय पराक्रम व दृढनिश्चयाचे झालेले प्रकटीकरण आजही आचरणात आणण्याची आवश्यकता आहे.
'हिंदूंचा राजा असू शकतो' ही भावना समाजात रुजविण्यासाठी शिवरायांनी गागाभट्टांकडून स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला. त्या राज्याभिषेकाचे वर्णन ऐकतांना, वाचतांना आपण आजही हर्षभरीत होतो, शिवरायांनी रयतेत 'स्व' ची जाणीव निर्माण केली. त्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत न करता बी, बियाणे, खते, शेतीचे सामान अशी मदत केली. त्याबरोबरच शेतकऱ्यांना सैनिकी शिक्षण दिले. स्वतःचा राज्य व्यवहारकोष, राजमुद्रा, चलन, इतकेच नाहीतर 'शिवशक' कालगणना सुरु केली. जबाबदार प्रशासकीय यंत्रणा निर्माण केली.आजही शासनकर्त्यांना निर्माण होणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे महाराजांच्या विचारधारेत आहे. तरुणांना मार्गदर्शन करताना शिरुडे म्हणाले, प्रत्येकाने त्याला नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे केले पाहिजे आणि नाविन्याचा स्वीकार करत व्यवसायाभिमुख दृष्टिकोन ठेवला पाहिजे. महाराजांनी समोर चालून आलेली संधी कधीच सोडली नाही व अंतीम ध्येय साध्य केले. आपल्याला अखंड भारताचे स्वप्न साकार करायचे असेल तर शिवराज्याभिषेकाची व त्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची आठवण ठेवावी लागेल असे प्रतिपादन केले. 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे' या संघप्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला दत्तनगर परिसरातील मोठा श्रोतुवर्ग उपस्थित होता.