मुंबई : महाराष्ट्र आणि जर्मनीतील बार्डेन गुटेनबर्ग या राज्यांत झालेल्या, सामंजस्य करारांतर्गत, राज्यातील १० हजार युवक- युवतींना जर्मनीमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, या उपक्रमाचा शुभारंभ, आज मुंबईत राजभवन इथं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी राज्यात सुरु असलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान, महावाचन उत्सव, माझी शाळा माझी परसबाग, माझी शाळा स्वच्छ शाळा आदि अभियानांच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ करण्यात आला. वाचन हे ज्ञान वाढवण्याचं सर्वोत्तम साधन असून, जेव्हा ज्ञान वाढतं तेव्हाचं आपल्या प्रतिभा आणि संस्कृतीचा विकास होतो. आणि जेव्हा दोन्हीचा विकास होतो तेव्हाच आपल्या कामाला पूर्णत्व येतं, असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं.
जर्मनीतील कार्यसंस्कृती आणि शिस्त शिकण्याचा सल्ला त्यांनी जर्मनीला जाणाऱ्या युवावर्गाला यावेळी दिला. देशाला २०४७ पर्यंत विकसित भारत बनण्यात, महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले. या करारामुळे विविध क्षेत्रातील, ३० ट्रेड्समध्ये १० हजार युवकांना रोजगाराची संधी देण्यात आली असून, आगामी काळात लाखो युवा वर्गाला ही संधी मिळणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात सांगितलं. हा प्रकल्प युवा वर्गाचं जीवनमान उंचावणारा लोकाभिमुख उपक्रम असल्याचं ते म्हणाले. राज्यातील कुशल अकुशल युवकांना याचा लाभ घेता येणार असून, आवश्यक त्या सर्व सोयीसुविधांसाठी राज्य सरकार देणार असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
पहिल्या खेपेत १० हजार तरूण जर्मनीला जाणार आहेत. या कार्यक्रमाला बार्डेन गुटेनबर्ग राज्याचे मुख्यंमंत्री, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, मंत्री गिरीष महाजन, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.