मुंबई : आज जागतिक आदिवासी दिन. आदिवासी समाजाची सांस्कृतिक समृद्धता, मानवतेबद्दल असीम श्रद्धा, निसर्गावरील अतुलनीय प्रेम, अत्युच्च प्रामाणिकपणा आणि पारंपरिक निखळ गुणांचा गौरव म्हणून दरवर्षी जागतिक स्तरावर ९ ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
पुणे जिल्हयातील जुन्नर इथं आदिवासी संघटनेच्यावतीनं शोभा यात्रा काढण्यात आली. यावेळी, आदिवासी समाजाचा पेहराव करत नागरिक सहभागी झाले होते. तसंच जुन्नर बाजार समितीच्या आवारात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे. जळगाव जिल्ह्यात यानिमित्त रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवात जळगाव जिल्ह्यातल्या ५० पेक्षा अधिक महिला बचत गटांनी आणि शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. पालघरमधल्या कोसबाड इथंही कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं, रानभाजी महोसत्वाचं आणि पाककृती स्पर्धेचं, आयोजन करण्यात आलं होतं. आदिवासी भागातील जैवविविधता वैशिष्ट्यपूर्ण असून, त्यांचं संवर्धन आणि मूल्यवर्धन होणं गरजेचं आहे, असं मत या वेळी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था म्हणजेच, आत्माचे पालघरचे प्रकल्प संचालक विनायक पवार यांनी व्यक्त केलं. शाश्वत शेतीसाठी आदिवासी बांधवाकडील पांरपारिक शेतीचं ज्ञान महत्त्वाचं आहे. आदीवासी शेतकऱ्यांनी, रानभाज्यांच्या पेयांचं विक्री कौशल्य आत्मसात करावं, असं आवाहन यावेळी त्यांनी केलं. पालघर जिल्ह्यात भूमीसेना-आदिवासी एकता परिषदेच्या वतीनं पालघर शहरात महान क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली काढण्यात आली.
यावेळी पारंपरिक वेशभूषा करून आदिवासी बांधवानी तारपा लोकनृत्य सादर केलं. नंदुरबार इथं जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त राज्यस्तरीय आदिवासी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आदिवासी बांधवांची परंपरा आणि संस्कृती जतन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असं मत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केलं.
आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात यायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. चांगल्या शिक्षणासाठी आदिवासी विकास विभाग सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहे. आश्रमशाळांमधून दर्जेदार शिक्षणासोबतच स्वयंम योजनेतून तालुकास्तरावर निधी सुद्धा देणार असल्याचे त्यांनी सांगितलं. तसंच, उच्च प्रतिचं शिक्षण मिळावे म्हणून आश्रमशाळा डिजीटल करत आहोत, असंही ते म्हणाले.