डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्वेकडील ब्राह्मण सभेजवळ कल्याण डोंबिवली महानगर पालिका शाळेच्या बंद इमारतीत दारूच्या बाटल्यांचा खच, सिगारेटची पाकिटे आढळून आल्याने मनसे पदाधिकारी व मनसैनिक संतापले. या ठिकाणी सायंकाळी गर्दूल्ल्याचा वावर असल्याने परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. सदर धोकादायक इमारत तोडून त्याजागी मराठी शाळेची नवीन इमारत बांधवी अशी मागणी पालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्याकडे केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर मनसे माजी नगरसेवक मनोज घरत, उपशहरअध्यक्ष दिपक शिंदे,विभागअध्यक्ष रविंद्र गरुड यांनी शाळेच्या धोकादायक इमारतीची पाहणी केली. बंद शाळेतील तळमजल्यावर सिगारेटची असंख्य पाकिटे,दारुच्या बाटल्यांचा खच आढळून आला.मोठ्या प्रमाणावर संध्याकाळ नंतर येथे गर्दुल्ले नशा करणारी मंडळी येतात असे स्थानिकांनी सांगितले.दुर्दैवाने तरुण तरुणींचाही वावर रात्री येथे असल्याची माहिती मिळाली.मनसेचे माजी नगरसेवक यांनी सदर जागेची पाहणी करुन सदर विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना याबाबत काहीही माहिती नसल्याचे आढळून आले.सदर गोष्टीची तात्काळ दखल घेऊन सुरक्षारक्षक नेमावा व लवकरात लवकर सदर शाळा पाडुन नविन सुसज्ज मराठी शाळा बांधावी यासाठी मनसे पाठपुरावा करणार असल्याचे घरत यांनी सांगितले.