आय.टी.आय. मधील अनुभवी तासिका तत्त्वावरील निदेशकांना कंत्राटी सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडणार – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
सप्टेंबर २३, २०२४
मुंबई, दि. 23 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील अनुभवी तासिका तत्त्वावरील निदेशकांना विभागाअंतर्गत कंत्राटी पद्धतीने समायोजन करण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार आयोजित बैठकीत ते बोलत होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील अनुभवी तासिका निदेशकांना कंत्राटी सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी कौशल्य विकास विभागाने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केली होती.
कौशल्य विकास मंत्री श्री.लोढा यांच्या दालनात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांना तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत मागणीच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी वन मंत्री श्री. मुनगंटीवार, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, व्यवसाय व शिक्षण मंडळाचे संचालक सतीश सूर्यवंशी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व महाराष्ट्र राज्य आय. टी. आय. निदेशक संघाचे अध्यक्ष अनिलकुमार होटकर, यांच्यासह रूपेश तायडे, प्रशांत भोंडवे, रोहन सराफ आदि पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. लोढा म्हणाले की, तासिका तत्त्वावरील अनुभवी निदेशकांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देणे हा धोरणात्मक निर्णय आहे. यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी या विषयाच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळासमोर हा विषय सादर करण्यात येईल. कौशल्य विकास विभाग हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.
वन मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील गेल्या अनेक वर्षांपासून अल्प मानधनात लोकांनी काम केले आहे. मात्र विभागाअंतर्गत केल्या गेलेल्या 1 हजार 457 पदांचा भरतीमुळे अनुभवी तासिका निदेशकांना कामावरून कमी करण्यात आले असून त्यांचावर बेरोजगारीची वेळ आलेली आहे. अशा अनुभवी तासिका निदेशकांना विभागांतर्गत कंत्राटी पद्धतीने सामावून घेण्यात यावे. तसेच याबाबतीत विशेष धोरण अंवलंबून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आय.टी.आय.निदेशक संघाने केली होती. याबाबतीत कौशल्य विकास विभागाने सकारात्मक पावले उचलून मंत्रीमंडळाची याबाबीसाठी मान्यता घ्यावी, अशा सूचना वन मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी केला.