डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात लहान मोठी मिळून सुमारे 65 उद्याने आहेत. तसेच एकुण 17 मैदाने देखील नागरीकांसाठी उपलब्ध आहेत. तथापि सद्याच्या असलेल्या सुमारे 20 लाख लोकसंख्येच्या तुलनेत जनमानसासाठी विरंगुळ्याचे मोठे केंद्र असलेल्या उद्यानांची संख्या वाढविणे जास्त गरजेचे आहे. त्याचप्रमाणे अस्तित्वात असलेली उद्याने व मैदाने सुसज्ज ठेवणे ही देखील काळाची गरज आहे.या दृष्टीकोनातून अस्तित्वातील मैदाने व उद्याने विद्यार्थी, लहान मुले, नागरीक यांच्यासाठी सुस्थितीत उपलब्ध राहवीत याकरीता महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी महापालिकेच्या यावर्षीच्या अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद उपलब्ध करुन दिली आहे.
महापालिकेला गतवर्षी शहर सौंदर्यीकरणांतर्गत 100 कोटीचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. या रक्कमेतून उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने टिटवाळा येथे एका सुसज्ज अशा उद्यानाचे काम सुरु केले आहे. त्याचबरोबर कल्याण (पश्चिम) येथील राणी लक्ष्मीबाई उद्यान, कल्याण पूर्वेतील खडेगोळवली येथील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी उद्यान, डोंबिवली (पूर्व) येथील गजबंधन पाथर्ली उद्यान तसेच डोंबिवली (पश्चिम) येथील मिनाताई ठाकरे उद्यान नुतनीकरणाचे काम देखील हाती घेण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांच्या संकल्पनेतून आता महापालिका क्षेत्रातील प्रत्येक परिसरात सुसज्ज बगीचा तयार करण्याचा उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचा मानस आहे.नांदीवली येथील भोपर टेकडी हे पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे. जेथे पक्षी पाहण्यासाठी दूरदूरुन पर्यटक येतात. या टेकडीच्या सुशोभिकरणाचे काम देखील हाती घेण्यात आले आहे.
ॲमेनिटी टीडीआर च्या माध्यमातून बारावे व्हीलेज येथे "एक सुसज्ज बगीचा म्हणजे ऑटीजम व्हीलेज"* तयार करण्यात येत आहे. स्पेशल चाईल्ड म्हणजे विशेष मुलांना उद्यानांमध्ये किंवा मैदानांमध्ये जाऊन खेळता-बागडता येत नाही, अशा विशेष मुलांसाठी या सुसज्ज बगीच्याचेदेखील काम प्रगतीप्रथावर असून, येत्या 6-8 महिन्यात हा बगीचा नागरीकांसाठी खुला होईल.महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी आता उद्यान व मैदानाच्या देखभालीवर लक्ष केंद्रीत केले असून, त्यांच्या निर्देशानुसार मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव यांनी शहरातील सर्व उद्याने व मैदाने यांची त्रेवार्षीक निविदा काढली असून, त्याचे कार्यादेश लवकरच देण्यात येतील. त्यामुळे उद्यानात होणा-या किरकोळ दुरुस्त्या (उदा.गेट तुटणे, बगिच्यांची दैनंदिन निगा, बगिचा स्वच्छ ठेवणे, गवत कापणे इ.) कामे नियमीत स्वरुपात बाह्ययंत्रणेद्वारे केली जावून ही मैदाने, बगिचे नियमित सुस्थितीत राहण्यास मदत होईल.उद्यानांमध्ये असलेली खेळणी, मैदानामध्ये नागरीकांसाठी विशेषत: ज्येष्ठ नागरीकांसाठी बनविण्यात आलेले व्यायामाची साहित्य वारंवार तुटण्याचे प्रकार दिसून येतात. तसेच उद्याने, मैदाने यांच्या दुरावस्थेबाबत नागरीकांकडून कधी-कधी तक्रारी प्राप्त होतात. परंतू आता देखभाल दुरुस्तीची त्रेवार्षीक निविदा देखील मंजूरीच्या प्रक्रियेत असल्यामुळे ही व्यायामाची साधने, ओपन जिम, खेळणी इत्यादींची निगा, देखभाल व दुरुस्ती संबंधित ठेकेदारामार्फत राखणे सहज शक्य होईल.