उरण दि २३ ( विठ्ठल ममताबादे ) : सातारा येथे २१/२२ डिसेंबर रोजी झालेल्या सर्जनशील शब्दवेल साहित्य संमेलनात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पकांत गावंडे यांच्या शुभहस्ते उरणचे सुपुत्र, जेष्ठ साहित्यिक एल बी पाटील यांना "आगरी बोली संवर्धन शब्दवेल पुरस्कार " हा प्रदान करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बोपुलकर यांनी शब्दवेलच्या चौथ्या साहित्य संमेलनात हा पुरस्कार आगरी बोलीतील ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्यांनी आगरीबोलीसह मराठी साहित्याची मोठी सेवा सेवा करित असलेल्या व्यक्तिमत्वाला दिला जात असल्याने आनंद झाल्याचे मत व्यक्त केले.
जेष्ठ साहित्यिक एल बी पाटील यांनी आगरी बोलीतील चार नाटके, दोन कविता संग्रह यासह मराठी साहित्यात ३५ पुस्तकांचे प्रकाशन केले आहे.एल बी पाटील हे महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य असून कोकण मराठी साहित्य परिषदेचे (कोमसापचे )ते जनसंपर्क प्रमुख आहेत. एल बी पाटील हे कोकणात साहित्य चळवळीत ४० वर्षे कार्यरत असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा असा हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल जेष्ठ साहित्यिक एल बी पाटील यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.