Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

कल्याण आणि भांडुप परिमंडलात ९ महिन्यांत ९ हजार २५७ वीजचोरांवर कारवाई


४६ कोटी ७८ लाखांची वीजचोरी उघड; ९०६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल; महावितरणचा कारवाईचा धडाका

डोंबिवली ( शंकर जाधव ) महावितरणच्या कल्याण आणि भांडुप परिमंडलाने वीजचोरी विरोधात धडक कारवाई केली आहे. गेल्या ९ महिन्यांत ९ हजार २५७ जणांविरुद्ध कारवाई करत महावितरणने ४६ कोटी ७८ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. वीजचोरीची देयके न भरणाऱ्या ९०६ ग्राहकांवर महावितरणतर्फे थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दोन्ही परिमंडलात ८८० जणांविरुद कारवाई करून ५ कोटी ७ लाख रुपयांचा अनधिकृत वीजवापर उघडकीस आणण्यात आला आहे.

कल्याण परिमंडलात १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२४ या नऊ महिन्यांच्या कालावधीत आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या २ हजार ६२५ जणांवर कारवाई करून ४ कोटी ६६ लाख रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली. तर मीटरमध्ये फेरफार अथवा टॅपिंग करून विजेचा चोरटा वापर करणाऱ्या ३ हजार ९४२ जणांकडे २२ कोटी ४० लाख रुपयांची वीजचोरी आढळून आली. याशिवाय ४०३ जणांविरुद्ध कारवाई करून २ कोटी २३ लाख रुपयांचा विजेचा चोरटा वापर उघडकीस आणण्यात महावितरणच्या पथकांना यश आले. चोरीच्या विजेचे देयक व दंडाचा भरणा टाळणाऱ्या ८१८ जणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भांडुप परिमंडलात नऊ महिन्यांच्या कालावधीत आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या ४१७ जणांवर कारवाई करून १ कोटी ९९ लाख रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली. तर मीटरमध्ये फेरफार अथवा टॅपिंग करून विजेचा चोरटा वापर करणाऱ्या २ हजार २७३ जणांकडे १७ कोटी ७३ लाख रुपयांची वीजचोरी आढळून आली. याशिवाय ४७७ जणांविरुद्ध कारवाई करून २ कोटी ८४ लाख रुपयांचा विजेचा चोरटा वापर उघडकीस आणण्यात महावितरणच्या पथकांना यश आले. चोरीच्या विजेचे देयक व दंडाचा भरणा टाळणाऱ्या ८८ जणांविरुद्ध वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वीजचोरी हा सामाजिक आणि जबर शिक्षा व दंडाची तरतूद असलेला गंभीर फौजदारी गुन्हा आहे. या गुन्ह्यात तीन वर्षे कारावास किंवा दंड अथवा या दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. ही बाब लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारे विजेचा चोरटा किंवा अनधिकृत वापर कटाक्षाने टाळावा. अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

कार्यालय आकडेबहाद्दर रक्कम (कोटी रु.)मीटरमध्ये फेरफार रक्कम (कोटी रु.) अनधिकृत वापर रक्कम (कोटी रु.) दाखल गुन्हे

कल्याण परिमंडल -  २६२५ ४.६६ ३९४२ २२.४० ४०३ २.२३ ८१८

भांडुप परिमंडल -  ४१७ १.९९ २२७३ १७.७३ ४७७ २.८४ ८८

एकूण - ३०४२ ६.६५ ६२१५ ४०.१३ ८८० ५.०७ ९०६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Design by - Blogger Templates |