ठाणे - महावाचन उत्सव -2024 अंतर्गत जिल्हा ग्रंथ प्रदर्शनाचे उद्धाटन आज, दि. २३ जानेवारी, २०२५ रोजी बैरामजी जीजीभाय हायस्कूल, ठाणे येथे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, तर प्रमुख अतिथि म्हणून रेडिओ जॉकी संग्राम खोपडे, परिवर्तन संस्थेचे डॉ. हमीद दाभोळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे, अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे, व्यक्तिमत्त्व विकासास चालना देणे तसेच भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देण्यासाठी सन 2024-25 या वर्षात राज्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव-2024 राबविण्यात आले असून विद्यार्थ्यीं मोबाईल वापरापेक्षा पुस्तक वाचन करत आहेत ही आनंदाची बाब असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी मार्गदर्शन करताना मत व्यक्त केले.
महावाचन उत्सव 2024 या उपक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय खुले ग्रंथ प्रदर्शन व तालुका आणि महानगरपालिका येथिल इयत्ता 3 री ते 12 वी मधील सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमाच्या शाळेतील परिक्षकांमार्फत निवड केलेल्या एकूण 108 विद्यार्थ्यांना व त्यामधील जिल्हास्तरीय 9 निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावर पारितोषिक म्हणून पुस्तके मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली.
रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने उपक्रम राबविण्यात आले असून गट अ- 3 री ते 5 वी, गट ब - 6 वी ते 8 वी, गट क - 9 वी ते 12 वी अशा तीन गटातील उत्कृष्ट वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला गेला.
उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी वेब प्रणाली तयार केली असून त्यावर विद्यार्थ्यांनी अवांतर भाषेचे पुस्तक वाचन करून त्यावर विचार करून तो विचार लिखित स्वरूपात शाळांमार्फत वेब प्रणालीवर अपलोड केले आहे. शाळास्तर मूल्यांकन, तालुकास्तरावर/ मनपास्तर मूल्यांकन, जिल्हास्तर मूल्यांकन यानुसार तीन स्तरावर विद्यार्थ्यांच्या वाचनाचे मूल्यांकन करण्यात आले आहे.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, लघुपाट बंधारे विभाग प्रमुख दिलीप जोकार, जिल्हा कृषी अधिकारी एम.एम. बाचोटीकर, विद्यार्थी, पालक व त्यांचे वर्ग शिक्षक तसेच समग्र शिक्षा, जिल्हा परिषद, ठाणे येथील सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.