Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

जिल्हा परिषद ठाणे आयोजित कर्मचाऱ्यांच्या सुदृढ मानसिक आरोग्यासाठी MYCA ॲप उद्घाटन सोहळा संपन्न

 
ठाणे - जिल्हा परिषद, ठाणे आयोजित मानसिक आरोग्य विषयक जनजागृतीच्या उद्देशाने परिवर्तन व वोपा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘मायका’हे मराठीमध्ये पहिले ॲप तयार करण्यात आले आहे. मानसिक आरोग्य या कोर्स चा लोकार्पण सोहळा आज, दि. २३ जानेवारी, २०२५ रोजी बैरामजी जीजीभाय हायस्कूलच्या सभागृहामध्ये पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, तर प्रमुख अतिथि म्हणून रेडिओ जॉकी (RJ) संग्राम खोपडे, परिवर्तन संस्थेचे डॉ. हमीद दाभोळकर, वोपा संस्थेचे संचालक प्रफुल्ल शशिकांत, संचालिका ऋतुजा जेवे हेही उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने कर्मचाऱ्यांच्या सुदृढ मानसिक आरोग्यासाठी MYCA ॲप तयार करण्यात आले असून या ॲपच्या निर्मितीसाठी नोसील लि. (NOCIL Ltd) आणि मोरडे फूडस यांचे अर्थसहाय्य लाभले आहे. कर्मचारी यांच्या सुदृढ आरोग्यासाठी अॅपची मदत होणार असून सर्वांनी अॅप डॉउनलोड करावे व आवश्यक असल्यास डॉक्टरांची मदत घेणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी उपस्थित सर्वांना केले.

यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, लघुपाट बंधारे विभाग प्रमुख दिलीप जोकार, जिल्हा कृषी अधिकारी एम.एम. बाचोटीकर, शिक्षक, विद्यार्थी तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रोडिओ जॉकी (आर.जे) संग्राम खोपडे यांनी मानसिक ताण तणावाच्या उत्क्रांती संदर्भांतील माहिती दिली. आजच्या डिजिटल जगातील वाढलेल्या तणावावर बोलताना त्यांनी माणसाच्या एखाद्या समस्येला सामोरे जाण्यासाठी लढा किंवा पळा या प्रतिसादावर भाष्य केले. ज्याप्रमाणे आपण शारिरीक व्याधींवर बोलतो, त्याचप्रमाणे मानसिक आरोग्यावर देखील बोलणे महत्त्वाचे आहे. लोकांमध्ये माहिती प्रसारित करण्यात समाज माध्यमांची व सेलेब्रिटींची भूमिका देखील महत्त्वाची आहे. आयुष्यात भावना का महत्वाच्या असतात, भावनांना योग्य पद्धतीने व्यक्त करणे का महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण स्वतःसाठी व कुटुंबासाठी देखील पुरेसा वेळ देणे आवश्यक असल्याबाबत त्यांनी मत व्यक्त केले.

डॉ. हमीद दाभोळकरांनी ‘मायका’ अॅपच्या निर्मिती मागील पाश्वभूमी सांगताना ‘मानसिक आजार हे योग्य उपचाराने बरे होऊ शकतात’ यावर भर दिला. परिवर्तन व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोळकर यांनी शासन यंत्रणेचे कौतुक करताना जिल्हा परिषद, ठाणे महाराष्ट्रातील मानसिक आरोग्याबाबत उपक्रम राबविणारी पहिलीच जिल्हा परिषद असल्याचे उद्गार काढले. त्यांनी वयात येणाऱ्या मुलामुलींच्या भावना कशा हाताळाव्या याचे प्रशिक्षण शिक्षकांना, पालकांना उपलब्ध नाही, याकडे लक्ष वेधले. याबद्दल 'मायका' अॅप मध्ये 'भावनिक प्रथमोपचार' या भागात त्याविषयीची शास्रोक्त माहिती उपलब्ध असल्याची माहिती दिली.

वोपा संस्थेचे संचालक प्रफुल्ल शशिकांत यांनी शिक्षण क्षेत्रात ३० लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्यानंतर आता मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करत असताना आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली. “मानसिक आरोग्यासंदर्भात सकारात्मकतेइतकीच स्विकारात्मकता देखील महत्त्वाची असते”, असे प्रतिपादन केले.

मायकामध्ये मानसिक आरोग्य, आजारांविषयी, शास्त्रीय माहिती, स्वतःला आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना भावनिक आधार कसा द्यावा, मानसिक आरोग्याविषयीचे प्रशिक्षण, तज्ञ व्यक्तींशी संपर्क साधण्याची यंत्रणा आदी माहिती मराठी भाषेत उपलब्ध आहे. मायका ॲप द्वारे कर्मचाऱ्यांना त्यांच्या ताण-तणावाचे व्यवस्थापन कसे करावे, भावनिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी कोणती तंत्रे उपयुक्त ठरतील, काम व वैयक्तिक आयुष्य यात संतुलन कसे राखावे, इत्यादीविषयी सविस्तर माहिती उपलब्ध असून या ॲप मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) सहाय्याने चॅटबॉटशी संवाद साधता येणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वोपा चे स्वप्नील क्षीरसागर यांनी तर आभार प्रदर्शन ठाणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी (शिक्षण) आशिष झुंजारराव यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Design by - Blogger Templates |