आधुनिक युगात अखिल मानवतेला अहिंसेचा संदेश देणाऱ्या ,राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी. पुण्यतिथीचं औचित्य साधून आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत राजघाट इथं गांधीजींच्या समाधीस्थळी भेट देऊन त्यांना पुष्पांजली अर्पण केली.
राजघाट इथं गांधीजींच्या स्मृतिस्थळावर सर्वधर्म प्रार्थनेचंही आयोजन करण्यात आलं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षनेते राहुल गांधी यांनीही राजघाट इथं गांधीजींना श्रद्धांजली अर्पण केली. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. गांधीजींनी दिलेला अहिंसेचा संदेश प्रत्येक देशवासियाच्या मनात आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजचा दिवस हुतात्मा दिवस म्हणून पाळला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीजींना आदरांजली वाहिली आहे.
विकसित भारताच्या निर्मितीसाठी बापूंनी सांगितलेली मूल्यं देशाला प्रेरणा देतात, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. तसंच देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सर्वांना पंतप्रधानांनी हुतात्मा दिनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्या सर्वांनी केलेल्या देशसेवेचं आणि बलिदानाचं कृतार्थ स्मरण करत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.