कला, संस्कृती आणि सर्जनशील कलाविष्काराचं दर्शन घडवणाऱ्या मुंबईतल्या काळा घोडा महोत्सवाला सुरूवात झाली आहे. यंदा या महोत्सवाला २५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सिल्व्हर हि संकल्पना घेऊन महोत्सवात कलाकृती मांडण्य़ात आल्या आहेत.
यावर्षी सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने प्रत्येक कलाकाराच्या कलेचा गौरव करणाऱ्या ‘लंबी रेस का घोडा’ या संकल्पनेवर आधारित सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा तयार करण्यात आला आहे देशाच्या विविध भागातून आलेल्या कलाकारांच्या कलाकृतींच्या विक्रीसाठी १०० हुन अधिक दालने उभारण्यात आली आहेत. बांबू आणि स्टीलच्या बाटल्यांची विशिष्ट मांडणी करून साकारलेले महोत्सवाचे प्रवेशद्वार, भंगारापासून तयार केलेल्या घोड्याच्या प्रतिकृतीसह काचेच्या तुकड्यांपासून नक्षीकाम केलेली घोड्याची प्रतिकृती, प्रवेशद्वारालगतच हुबेहूब केकसारखी भासणारी चारचाकीची प्रतिकृती खास आकर्षण ठरल्या आहेत. २ फेब्रुवारीला या महोत्सवाची सांगता होईल.
काळा घोडा महोत्सवाच्या आयोजनात सलग तिसऱ्या वर्षी एक्झिम बँकेचा सहयोग मिळाल्यामुळे भारतातल्या अप्रसिद्ध कारागिरांचं कौशल्य जगासमोर आणण्याचं उद्दिष्ट साध्य करता येत आहे, अशा शब्दात महोत्सवाच्या आयोजकांनी समाधान व्यक्त केलं.