दिवा : दिवा प्रभाग समिती मधील स्वच्छ्ता विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून त्याची विभागीय चौकशी करण्याची मागणी आज दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांची भेट घेवून केली.
दिवा शहरातील काही प्रमुख रस्ते सोडल्यास इतर ठिकाणी महापालिकेच्या सफाई कामगारांकडून साफसफाई होताना दिसत नाही. जागोजागी रस्त्यावर कचऱ्याचे लागलेले ढीग याची साक्ष देत असतात. यासंदर्भात स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता. अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण नेहमीच दिले जाते. पण सफाई कामगारांचा हा तुटवडा म्हणजे मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप मनसेने केला आहे. महापालिकेच्या पगारावर कार्यरत असलेले अर्ध्याहून जास्त कामगार हे कामावर उपस्थित न राहताही त्यांचे हजेरी लावली जात असल्याची आणि याबदल्यात कामगारांच्या पगारातील ठराविक रक्कम मोबदला म्हणून घेतला जात असल्याची धक्कादायक माहिती मिळाल्याचे मनसेने आपल्या पत्रात म्हटले आहे.
कंत्राटी सफाई कामगारांच्या बाबतीतही असाच प्रकार घडत असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्तांच्या लक्षात आणून दिले आहे. सफाई कामगारांच्या या कृत्रिम टंचाईमुळे दिवा शहरातील सर्व विभागांमध्ये साफसफाई होत नसून त्यामुळे दिवा शहरातील विविध विभागांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येते. त्यामुळे या सर्व प्रकारची विभागीय चौकशी करून या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
यावेळी मनसेचे दिवा शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील, देवेंद्र भगत, उपविभाग अध्यक्ष शैलेंद्र कदम हे पदाधिकारी उपस्थित होते.