अंबरनाथ दि. ०२ (नवाज वणू) अंबरनाथ विधानसभा हद्दीतील उल्हासनगर नेताजी चौक येथे रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. एका बाजूला रस्त्याचे खोदण्यात करण्यात येत आहे आणि त्यातच ड्रेनेज लाईनचे देखील काम चालू आहे. परंतु, सदरचे काम करत असताना रस्त्यावरील ड्रेनेज लाईनचे चेंबर हे वरती करण्यात आलेले आहे. त्यामुळे येथे अनेक दुचाकी व चारचाकी वाहने या चेंबरला धडकून अपघाताचे बळी ठरत आहेत.
अंबरनाथमधील माजी नगरसेवक विलास हरिभाऊ जोशी यांची कार या चेंबरवरून जात असताना गाडीचा खालचा भाग चेंबरला धडकल्याने त्यांची ऑईल टाकी फुटली आणि त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जोशी यांनी सांगितले की, येथील दुकानदारांचे म्हणणे आहे की, हा रस्ता लांबपर्यंत खोदण्यात आला आहे. हे ड्रेनेज लाईनचे चेंबर वरती असल्याने या चेंबरला दररोज कुठल्या ना कुठल्या वाहनाची धडक बसून याठिकाणी अपघात होत असतात. रस्त्याचे काम संथ गतीने चालू असल्याने येथील दुकानदारांच्या दुकानात धूळ आणि मातीचा खूपच त्रास सहन करावा लागत आहे. येथील रस्त्याचे काम लवकरात लवकर प्रशासनाकडून करण्यात यावे असे म्हणणे येथील दुकानदारांचे आहे.
याबाबत उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार करून येथील रस्त्याचे सुरू असणाऱ्या कामाला गतीने करावे व लवकरात लवकर येथील नागरिकांसह दुकानदारांना व वाहनचालकांना होणारा त्रास दूर करावा. अशी मागणी करणार असल्याचे माजी नगरसेवक विलास हरिभाऊ जोशी यांनी सांगितले.