ठाणे :- प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे येथे आज राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 व शासनाच्या 100 दिवसाचा प्राधान्यक्रम या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन विभागामार्फत घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या पत्रकार परिषदेला संबोधताना श्रीमती हेमांगिनी पाटिल, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे यांनी गेल्या साधारणतः सहा महिन्यांमध्ये प्रादेशिक परिवहन विभागामार्फत केलेल्या उपाययोजना, जनजागृती कार्यक्रम, वायुवेग पथकांची कामगिरी याबाबत माहिती दिली.
यामध्ये सुमारे 1 हजार 500 चालकांची नेत्रतपासणी, 2 हजार स्कूल बस चालक व सहवर्ती यांचे शिबीर, ब्लॅक स्पॉट सर्व्हे तसेच त्यातील सुधारणा उपाययोजना, हेल्मेट वापराबाबत नागरीकांमध्ये जनजागृती, सायकल रॅली, दुचाकी रॅली, महिला कार रॅली, रक्तदान शिबीर, मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांचे शिबीर, 10 हजार विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा, शाळा-महाविद्यालयांमध्ये रस्ता सुरक्षतेबाबत व्याख्याने इत्यादी बाबींचा समावेश होता.
तसेच प्रादेशिक परिवहन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या माध्यमातून लेखक विजय कट्टी यांचे “आजीची-रस्ता सुरक्षा बाबतची गोष्ट” नावाचे लहान मुलांचे पुस्तक प्रकाशित करयात आले.
यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती हेमांगिनी पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मानसिंग खाडे, धनंजय गोसावी, गणेश पाटील, लेखक विजय कट्टी, सुप्रसिद्ध अभिनेते जयराज नायर व प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.