Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

ठाणे शहर परिसरात ३०.२६ कोटीचे अमली पदार्थ जप्त


ठाणे दि. २१ : ठाणे शहर परिसरात अमली पदार्थांची खरेदी विक्री करणाऱ्यांविरुध्द एनडीपीएस कायदा १९८५ प्रमाणे वेळोवेळी प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमध्ये २०२४-२०२५ मध्ये जूनपर्यंत ३० कोटी २६ लाख १७ हजार ७४३ रुपयांचा मुद्देमाल आणि ४४६ आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिली आहे.


सन २०२४-२५ मध्ये जूनपर्यंत ठाणे पोलीस आयुक्तालयाचे अंतर्गत प्रतिबंधीत गुटखा, विदेशी सिगारेट यांचे विरूध्द केलेल्या कारवाईमध्ये ५ कोटी ८९ लाख २३ हजार ५५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच २८३ आरोपी अटक करण्यात आले आहे.

अमली पदार्थ विरोधी पथक यांचेमार्फत ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत अंमली पदार्थांची खरेदी विक्री करणाऱ्यांवर सातत्याने कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती कार्यक्रम व परिसंवाद आयोजित करून अमली पदार्थांचे दुष्परिणांमाबाबत जागृती निर्माण करण्यात येत आहे. सन २०२४ व २०२५ मध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाचे अंतर्गत गांजा, मेफेड्रॉन, चरस, कोडीनयुक्त कफ सिरप व औषधी गोळ्या, कोकेन व इतर अमली पदार्थ या अंमली पदार्थांची खरेदी विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

नागरीक व विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांचे दुष्परिणाम याबाबत जागृतता निर्माण होण्याकरिता ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतुन ठाणे पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रामधील २९ शाळा, महाविद्यालयामध्ये अंमली पदार्थाबाबत जनजागृती व्हावी याकरिता परिसंवाद आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये सुमारे ३५०० विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले आहे. जनजागृतीसाठी पत्रकांचे वाटप रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड, रिक्षा स्टॅण्ड, चौकामध्ये, शाळा व कॉलेज परिसरामध्ये करण्यात आले आहे.

याबाबत जनजागृतीसाठी डीजीटल जाहिराती रेल्वे स्टेशन परिसर, मॉल, सिनेमागृह इ. सार्वजनिक ठिकाणी प्रसारित करण्यात येत आहे. अमली पदार्थ विरोधी जनजागृती करणारे बॅनर व पोस्टर शहरातील वेगवेगळया ठिकाणी लावण्यात आले आहेत.

महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांसाठी ‘अमली पदार्थाचे सेवनाचे दुष्परिणाम’ या विषयावर निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये एकुण १२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.


गृहविभागाच्या निर्देशानुसार गोपनिय छापे, गुन्हे दाखल करणे, परवाने तपासणे अशा अनेक स्तरांवर कारवाई करण्यात आली आहे. मोहिमेमुळे अशा बेकायदेशीर धंद्यांना आळा बसत असुन भविष्यातही ही कारवाई अधिक प्रभावीपणे सुरू राहिल, असेही सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |