दिवा : दिवा शहरातील ज्या शाळांमध्ये RTE च्या विद्यार्थांचे प्रवेश झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना शाळेने पाठ्यपुस्तके आणि वह्या मोफत देणे बंधनकारक आहे. पण जुलै महिना संपायला आल्यानंतरही या शाळांनी RTE च्या विद्यार्थ्यांना पुस्तके आणि वह्या न देण्याचा आडमुठेमणा सुरूच ठेवला आहे. याबाबत दिवा मनसेने आता आपले सरकार प्रणालीच्या माध्यमातून शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग - मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोग यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.
ठाणे महानगर पालिका शिक्षण विभागाने या सर्व शाळांना ३ जुलै २०२५ रोजी RTE विद्यार्थ्यांना नियमानुसार पुस्तके देण्याची नोटीस बजावली होती. पण या शाळांनी त्या नोटिशीला केराची टोपली दाखवली आहे.
एका बाजूला RTE च्या मुलांना शाळा पुस्तके देत नाही तर दुसरीकडे वर्गात पुस्तके आणली नाहीत म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून शिक्षा केली जात आहे. काही शाळांमध्ये RTE मधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे वर्गात बसवले जात आहे. असा आरोप मनसेने केला आहे.
"सरकार कडून आम्हाला पुस्तकांचे पैसे येत नाहीत; 'त्यामुळे आम्ही पुस्तके देणार नाही' अशी आडमुठी भूमिका शाळांनी घेतली आहे. त्यामुळे शासनाने RTE चे नियम न पाळणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करून त्यांची मान्यता रद्द करावी किंवा या शाळांना आर्थिक दंड आकारण्यात यावा अशी मागणी केली आहे.