पाच यश जीवनगौरव पुरस्कार प्रदान
स्वर्गीय राम ताकवले स्मृती उद्यान लोकार्पण व अर्धापुतळा अनावरण
नाशिक (प्रतिनिधी) – जगभरात मोठमोठी सामाजिक स्थित्यंतरे ही त्या त्या काळातील विद्यापीठांमध्ये विचार मंथनातून घडून आलेली आहेत. सद्या पारंपारिक विद्यापीठांपेक्षा मुक्त विद्यापीठे असे काम अधिक प्रभावीपणे करू शकतात. त्यामुळे भविष्यात भारताची समाजरचना कशी असावी यादृष्टीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने विचारमंथन घडवून आणावे अशी अपेक्षा भारताचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी येथे व्यक्त केली.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर मुक्त विद्यापीठाच्या प्रथम यश जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी पद्मश्री श्री. चैत्राम पवार, प्रा. रंगनाथ पठारे, श्री. प्रकाश पाठक, श्री. अशोक कटारिया, श्री. विवेक सावंत यांच्यासह विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव श्री. दिलीप भरड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना डॉ. काकोडकर पुढे म्हणाले की शिक्षणाचे उद्दिष्ट्य हे समस्या जाणून त्यावर उपाययोजना करणे हे हवे. परंतु स्वातंत्र्यपूर्वी काळापासून ॲनिमियाची (रक्तक्षय) समस्या आपणास भेडसावत आहे. तसेच आगामी काळात भेडसावणाऱ्या समस्यांची यादी ही अजून वेगळी असू शकते. त्यादृष्टीने पारंपारिक शिक्षणपद्धती ही जुनाट व चैतन्यहीन झालेली आहे. त्यादृष्टीने बघता आता शिक्षण आणि संशोधन हे वेगळे नसून एकमेकांना पूरक आहे हे लक्षात घेवून ते एकत्र चालायला हवे. समस्यावरील समाधान काढण्याची क्षमता ही शिक्षणात असायला हवी. विज्ञान तंत्रज्ञानासह मानव्यविद्या असे शिक्षण सर्वसमावेशक असायला हवे, ते जगाच्या पुढे जाण्यासाठी नव्हे तर आपल्या ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी. शहरी व ग्रामीण भागातील दरी मिटवायला हवी. उद्योगधंदे - उत्पादन प्रक्रिया आपण ग्रामीण भागात नेवू शकतो पण त्या तुलनेत शेती आपण शहरी भागात आणू शकत नाही. ग्रामीण भागातून शहरात स्थलांतर होण्यापेक्षा शहरातून ग्रामीण भागात स्थलांतर होणे गरजेचे आहे. सिलेज ही एक इकोसिस्टम आपण तयार करू शकतो. विद्यापीठांनी त्या दृष्टीने विचार करायला हवा. अलीकडेच पार पडलेल्या ‘सिंदूर’ मोहिमेत भारतीय तंत्रज्ञान हे शत्रुराष्ट्राच्या व त्यांच्या विदेशी तंत्रज्ञानापेक्षा अधिक प्रभावी व परिणामकारक ठरले. त्यामुळे येथे गुणवत्तेची कमी नाही. आता येथील मानव विकास निर्देशांक देखील वाढायला हवा. जगाची बहुतांश लोकसंख्या भारत-चीन -इंडोनेशिया या पट्ट्यात एकवटलेली असतांना साधनसामुग्री मात्र इतरत्र वळवली गेल्याचे दिसून येते. त्यामुळे यातून भविष्यात आणखी इतर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले. विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू प्रा. राम ताकवले हे वर्तमानात भविष्याचा अचूक वेध घेणारे शिक्षणतज्ञ होते. असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी त्यांच्या हस्ते पद्मश्री श्री. चैत्राम पवार (पर्यावरण, वनसंवर्धन व शेती), प्रा. रंगनाथ पठारे (साहित्य), श्री. प्रकाश पाठक (अर्थकारण व उद्योजकता आणि समाजकार्य), श्री. अशोक कटारिया (उद्योग व शिक्षण) व श्री. विवेक सावंत ( माहिती – तंत्रज्ञान) यांचा विद्यापीठातर्फे यंदापासून सुरु करण्यात आलेला प्रथम ‘यश जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून सत्कार करण्यात आला. शाल, स्मृतीचिन्ह, मानपत्र, धनादेश, स्वर्गीय राम ताकवले स्मृतीग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळ सदस्या डॉ. संजीवनी महाले यांचा उत्कृष्ट शिक्षिका म्हणून, श्री. सोमनाथ जाधव यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणुन तर नांदेड विभागीय केंद्राचा सर्वाधिक विद्यार्थी संख्या नोंदणी विभाग म्हणून, स्वर्गीय राम ताकवले स्मृती उद्यानाचे रचनाकार श्री. धनंजय साळकर, उद्यान बांधकाम व्यावसायिक श्री. अजय मालपुरे व स्वर्गीय राम ताकवले यांच्या अर्धपुतळ्याचे शिल्पकार श्री. श्रेयस गर्गे यांचा देखील गौरव करण्या आला. तसेच विद्यापीठाचे चार माजी कुलगुरू सर्वश्री प्रा. डॉ. बी. पी. साबळे, प्रा. डॉ. राजन वेळूकर, प्रा. डॉ. माणिकराव साळुंके, प्रा. डॉ. ई. वायुनंदन व शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) चे माजी कुलगुरू प्रा. डॉ. एम. जी. ताकवले यांचा मुक्त विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते तर प्र-कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या हस्ते मुक्त विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. पंडित पलांडे व माजी प्रा. डॉ. अनुराधा देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक करतांना मुक्त विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांनी दर्जेदार अभ्यास साहित्य हे विद्यापीठाचे बलस्थान असून नवीन आव्हाने पेलण्यास विद्यापीठ सक्षम असल्याचे सांगितले. यावेळी बोलतांना माजी कुलगुरू प्रा, डॉ. राजन वेळूकर यांनी दिवंगत प्रा. राम ताकवले यांनी या मुक्त विद्यापीठाच्या प्लॅटफॉर्मची उभारणी केल्यामुळेच आम्हाला कुलगुरू म्हणून येथे काम करता आले व त्यांनी मातृभाषा मराठीतून ३५ वर्षांपूर्वी दर्जेदार अभ्यास साहित्य निर्मितीचा पायंडा घालून दिल्याचे सांगितले. माजी कुलगुरू प्रा. माणिकराव साळुंखे यांनी शिक्षणशास्त्रामध्ये दिवंगत प्रा. राम ताकवले यांच्या इतका तज्ञ व्यक्ति माझ्या पाहण्यात आला नसल्याचे सांगितले. माजी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी दिवंगत प्रा. राम ताकवले यांनी नाशिक सारख्या शहरापासून दूर माळरानावर मुक्त शिक्षणाची संकल्पना नवीन असतांना विद्यापीठ उभारणी करून दाखविली. त्यामुळे शहर किंवा जागा महत्वाची नसून व्यक्ति व त्याची जिद्द महत्वाची असल्याचे सांगितले. दिवंगत प्रा. राम ताकवले यांचे बंधू तथा शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) चे माजी कुलगुरू प्रा. डॉ. एम. जी. ताकवले यांनी एकीकडे शेतकऱ्यांसाठी शिक्षणक्रम सुरु करणे आणि दुसरीकडे नवीन तंत्रज्ञानाचा शिक्षणात समावेश करणे असे सर्वसमावेशी व दूरदृष्टीचे व्यक्तीमत्व म्हणजे दिवंगत प्रा. राम ताकवले होते असे सांगितले.
सत्कारास उत्तर देताना पद्मश्री श्री. चैत्राम पवार यांनी विद्यापीठाने ग्रामीण भागात काम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शास्वत विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाचे सहाय्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रा. रंगनाथ पठारे यांनी मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून जाहीर झाली असली तरी आपला सर्वसामान्यांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही. मराठी ही खूप समृद्ध व श्रीमंत भाषा आहे, इतर भाषा नंतरही शिकता येतील अशी पुस्ती त्यांनी जोडली. श्री. प्रकाश पाठक यांनी शिक्षणात माझ्याकडे जे आहे ते दुसऱ्याकडून आलेले आहे त्यामुळे ते आणखी इतरांना द्यावे अशी भावना ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. श्री. अशोक कटारिया यांनी या पुरस्कारामुळे विद्यापीठातील जुन्या आठवणी जागृत झाल्याचे सांगत हा पुरस्कार आपल्या एकट्याचा नसून सहकाऱ्यांचा देखील असल्याचे नम्रपणे नमूद केले. श्री. विवेक सावंत यांनी सदर पुरस्कार हा जीवनगौरव सोबत व्हिजन व मिशन पुरस्कार देखील असल्याचे सांगत पुरस्कार हे सांघिक कार्य व सहकारी वर्गाला अर्पण केले
तत्पूर्वी सकाळी डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते विद्यापीठ प्रांगणात भांडार कक्षासमोरील विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू यांच्या नावाचे स्वर्गीय राम ताकवले स्मृती उद्यान आयचे लोकार्पण व प्रा. राम ताकवले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केले. त्याआधी विद्यापीठ आवारातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुक्त विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राज्यगीत व विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. वटवृक्षाच्या रोपट्यास मान्यवरांच्या हस्ते पाणी देवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, डॉ. दिलीप धोंडगे, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, डॉ. जयदीप निकम, डॉ. संजीवनी महाले यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रा. शुभांगी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विद्यापीठाचे कुलसचिव श्री. दिलीप भरड आभार यांनी प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.