ठाणे,दि.05 :- उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार, दि.4 ऑगस्ट 2025 रोजी ठाण्यातील वाहतूक संबंधी समस्यांबाबत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. याप्रसंगी भिवंडी-वाडा-मनोर मार्गावरील खड्ड्यांबाबतही चर्चा झाली. भिवंडी-वाडा-मनोर मार्गावरील खड्ड्यांमुळे नुकत्याच एका दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला होता. याबाबत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी आज भिवंडी-वाडा-मनोर मार्गाची स्थळपाहणी केली.
यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.डी. स्वामी, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, कार्यकारी अभियंता सचिन पाटील, उपअभियंता संपदा मोहरीर व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.पांचाळ म्हणाले की, सर्व विभागांनी आपापसात आवश्यक तो समन्वय राखून एकजुटीने या समस्येचे निराकरण करावे. यादरम्यान संभाव्य पाऊस, वाहनांची वाहतूक या सर्व बाबींच्या अनुषंगाने विचारपूर्वक आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री.पांचाळ यांनी दिले. तसेच ही सर्व कामे रस्ते सुरक्षा समितीच्या समन्वयाने तसेच अपघात होवू नये, यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा अवलंब करून मार्गी लावण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.