कल्याण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणमध्ये गरजू, अनाथ आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल आणि स्टडी टेबल वाटपाचा उपक्रम पार पडला. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, डॉ. राजू राम व ऍड. शिल्पा राम फाउंडेशन, तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. 2 (बिर्ला कॉलेज, खडकपाडा, वायलेनगर, बारावे) या परिसरातील अनुसूचित जाती-जमातीतील, आदिवासी कातकरी, अनाथ व निराधार, मागसवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा 8वी ते 10वी तील विद्यार्थ्यांची निवड करून डॉ राजु राम व ऍड शिल्पा राम यांच्या वतीने शंभर विद्यार्थ्यांना सायकली तर पन्नास विद्यार्थ्यांना स्टडी टेबल वाटण्यात आले.
सायकल व स्टडी टेबल शैक्षणिक मदत करण्यात आली. वितरण सोहळ्यावेळी विद्यार्थ्यांचे चेहेरे आनंदाने उजळले होते. “आतापर्यंत शाळेत जायला खूप अडचण यायची, आता ही सायकल मिळाल्यामुळे वेळेत पोहोचता येईल,” अशी भावना एका विद्यार्थिनीने व्यक्त केली. तर, “अभ्यासासाठी स्वतंत्र टेबल मिळाल्यामुळे अभ्यासात लक्ष देता येईल,” अशी प्रतिक्रिया दुसऱ्या विद्यार्थ्याने दिली. कार्यक्रमात उपस्थित ऍड. डॉ. राजू राम यांनी सांगितले, “शिक्षण हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे. कोणतीही अडचण त्याच्या शिक्षणात अडथळा बनू नये यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.
” यावेळी ऍड. शिल्पा राम म्हणाल्या, “बेटी बचाओ बेटी पढाओ ही केवळ घोषणा नसून आमच्या कार्याची दिशा आहे. वंचित मुली आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, हेच आमचं कर्तव्य मानून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे.”
कार्यक्रमास भाजपा कल्याण जिल्हा माजी जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, माजी शहराध्यक्ष वरुण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गायकवाड, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध जाधव, जिल्हा संयोजिका ऍड. शिल्पा राम, मध्य मंडळ अध्यक्ष रितेश फडके तसेच राम बनसोडे, सुनिल शेलार, मछिंद्र सूर्यवंशी, सुधीर वायले, ललिता साबळे, ग्लोरी राम, अजित चव्हाण, रमेश शिंदे, शिवाजी कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे समाजातून विशेष कौतुक होत असून, “ही सामाजिक दायित्वाची जाणीव दाखवणारी एक प्रेरणादायी पावले आहेत,” अशा शब्दांत उपस्थित पालकांनी आयोजकांचे अभिनंदन केले.