ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यात सायबर गुन्हयांच्या जलद तपासासाठी सायबर सेलची स्थापना केल्यानंतर आणि अनेक वर्ष प्रलंबित असलेले सायबर पोलीस ठाणे, ठाणे शहर याची इमारत बांधून घेवून ते कार्यान्वयीत केल्यानंतर श्री. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे यांच्या संकल्पनेतून ठाणे शहर पोलीस नवीन अभिनव उपक्रम राबवित आहेत.
पोलीस आयुक्तालय ठाणे शहर आणि डिकोडटेक इंडस्ट्रीयल ट्रेनिंग प्रा. लि. या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सायबर सेलच्या अधिकाऱ्यांना तांत्रीक तपासात मदत करण्यासाठी सायबर योद्धांची नियुक्ती करण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सर्व सायबर सेलमध्ये प्रत्येकी ४ असे एकूण १५० सायबर योद्धयांच्या नियुक्तीला मा. पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिली असून त्यापैकी पहिली बॅच ७२ योद्धयांची नियुक्ती आज दिनांक २५/०८/२०२५ रोजी झाली आहे. हे सर्व योद्धे ११ महिन्यांसाठी इंटरर्नशिप तत्वावर पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असणार असून सर्व विद्यार्थ्यांच्या ज्ञानात देखील भर पडणार आहे.
डिकोडटेक इंडस्ट्रीयल ट्रेनिंग प्रा. लि. ठाणे या कंपनीने प्रशिक्षीत केलेले सर्व सायबर योद्धे हे सायबर सिक्युरीटी, आर्टीफिशियल इंटेलिजन्स आणि डिजीटल फॉरेन्सीक चे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी आहेत. त्यांचा ज्ञानाचा सायबर गुन्हयांच्या तपासामध्ये मोठे योगदान असणार आहे. त्यांच्या मदतीने किचकट तांत्रीक तपासामध्ये मदत होणार असून सायबर गुन्हेगारांना पकडण्यासाठी त्यांची मदत मिळणार आहे.
सदर सायबर योद्धे नियुक्ती कार्यक्रम श्री. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे, डॉ.श्री.पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. पराग मणेरे, पोलीस उप आयुक्त (आर्थिक गुन्हे व सायबर), डिकोडटेक इंडस्ट्रीयल ट्रेनिंग प्रा. लि. कंपनीच्या संचालिका सौ. रेश्मा जाधव, श्री. प्रकाश वारके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन व पत्रकार बंधु-भगिनी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
