मुंबई: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक असलेल्या दहीहंडी – गोपाळकाला या सणासाठी यंदा घोषित केलेली सार्वजनिक सुट्टी शासनाने रद्द केल्याच्या निर्णयाविरोधात दहीहंडी असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) यांनी जोरदार आक्षेप नोंदवत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांना अधिकृत पत्राद्वारे निवेदन पाठवले आहे. असोसिएशनने आपल्या पत्रात नमूद केले आहे की,
"ही केवळ एक सुट्टी नसून, गोविंदा पथकांमधील युवकांसाठी श्रद्धा, परंपरा आणि सामूहिकतेचा सन्मान आहे. या दिवशी लाखो तरुण, कामगार, विद्यार्थी व नोकरदार वर्गातील गोविंदा मंडळे सहभाग घेतात. सुट्टी न मिळाल्यास त्यांना या परंपरेत सहभागी होता येणार नाही, ज्यामुळे त्यांच्यावर अन्याय होईल."
दरवर्षीप्रमाणे यंदाही १६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या गोपाळकाला सणासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली होती. मात्र, ती रद्द केल्यामुळे राज्यभरातील गोविंदापथकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर दहीहंडी असोसिएशनने सुट्टी पुनर्प्रस्थापित करण्याची मागणी केली आहे.असोसिएशनने यासंदर्भात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ईमेल व लेखी पत्राद्वारे सविस्तर निवेदन सादर केले असून, तातडीने निर्णय पुनर्विचार करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
दहीहंडी हा केवळ सण नसून तरुणाईच्या जोश, सहकार्य व निष्ठेचे प्रतीक आहे. त्यामुळे शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, हीच तमाम गोविंदांची अपेक्षा आहे.