ठाणे /कल्याण ( अशा रणखांबे ) : ठाणे येथील जोशी - बेडेकर महाविद्यालयाचे माजी मराठी विभाग प्रमुख मराठी, हिंदी साहित्यिक प्रा.दामोदर मोरे यांच्या साहित्यावर मौलाना आझाद नैशनल विद्यापीठ, हैदराबाद येथे पीएचडी प्रदान करण्यात आली. उत्तर प्रदेशातील अनीता कुमारी आता डॉ अनीता कुमारी झाली. या विद्यापीठातील हिंदी विभाग प्रमुख प्रो.डॉ रत्नाकर यांच्या मार्गदर्शनाखाली " दामोदर मोरे के साहित्य में आंबेडकरवादी चेतना - एक अध्ययन " या विषयावर
केलेल्या संशोधनाबद्दल अनीता कुमारीला पीएचडी पदवी बहाल करण्यात आली. विविध विद्यापीठात मोरे यांच्या हिंदी साहित्यावर सहा विद्यार्थी पीएचडीचा अभ्यास करीत आहेत. प्रा. दामोदर मोरे यांची मराठी भाषेत बारा तर हिंदीत सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. हिंदीत कवी, समीक्षक , कथाकार आणि वक्ते म्हणून ते सुपरिचित आहेत. हिंदीच्या अठरा लेखकांनी त्यांच्या पुस्तकांना मोरे यांच्या प्रस्तावना घेतल्या आहेत. तर दोन हिंदी लेखकांनी आपले पुस्तक दामोदर मोरे यांना अर्पण केले आहे. दिल्ली आणि बंगलोरच्या साहित्य अकादमीने ही त्यांना व्याख्यान आणि कविता वाचनासाठी पाचारण केले होते.
विशेष म्हणजे पंजाब साहित्य अकादमी
ने मागितल्या नुसार मोरे यांनी पंजाब साहित्य अकादमी च्या भारतीय भाषा काव्य विशेषांकासाठी कवी फादर स्टीफन्स यांच्या " जैसी हरळा माजी रत्नकिळा " , सुरेश भट यांच्या " लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" आणि स्वतःची "माझी माय ग मराठी" या कवितांचा हिंदी अनुवाद पाठवला. त्यांनी त्या मराठी कवितांचा पंजाबी भाषेत अनुवाद करुन अकादमीच्या भाषा काव्य विशेषांकात छापल्या. एका मराठी लेखकाची हिंदी साहित्याच्या क्षेत्रातील ही उत्तुंग झेप महाराष्ट्रासाठी निश्चितच आनंददायी आहे.