ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न
ठाणे,दि.21 :- या गणेशोत्सव काळात पर्यावरणाची काळजी घेत सुरक्षित उत्सवावर भर द्यावा. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये, यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होवू या, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज येथे केले.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्याच्या दृष्टीने आणि एकूणच गणेशोत्सवाची पूर्वतयारी यादृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल (भा.पो.से.), मिरा-भाईंदर पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण (भा.पो.से.), निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांच्यासह महसूल, पोलीस, महानगरपालिका, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य आणि महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ पुढे म्हणाले की, विसर्जन मार्गावरील खड्डे प्राधान्याने बुजवावेत आणि मंडप उभारणी करताना रस्त्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गणेश मंडळांना आवश्यक परवानग्या देण्यासाठी 'एक खिडकी' (Single Window) योजना प्रभावीपणे राबवावी. गणेशोत्सव काळात 24 तास अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करावा. गणेश मंडपांसाठी आवश्यक असलेल्या लाईट आणि इलेक्ट्रिक कामांची पाहणी करून धोकादायक वायर्स तात्काळ दुरुस्त कराव्यात. विसर्जन स्थळी सुरक्षा आणि अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवावी. बंद पडलेल्या गाड्यांमुळे वाहतुकीची कोंडी होवू नये म्हणून तात्काळ त्या हटविण्याचे नियोजन करावे.
ते पुढे म्हणाले की, ध्वनी आणि जल प्रदूषण टाळण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी. नागरिकांना शाडूच्या मातीच्या मूर्ती खरेदी करण्याचे आवाहन करावे आणि त्या उपलब्ध करण्यासाठी विशेष व्यवस्था करावी. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे जनजागृती मोहीम राबवावी. मंडळांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व सांगणारी पत्रके वाटपाचे निर्देश द्यावेत. गणेशोत्सव काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवावा. विशेषतः संवेदनशील ठिकाणी अधिक लक्ष द्यावे. मिरवणुकांमध्ये हॉस्पिटल्स आणि नागरी वस्त्यांच्या जवळून जाताना वाद्यांचा आवाज कमी करण्याचे आवाहन करावे.
गर्दीच्या ठिकाणांवर आणि महत्त्वाच्या विसर्जन स्थळांवर तात्पुरते कृत्रिम तलाव तयार करावेत. गणेश मूर्तींची विटंबना होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. कचरा व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करून प्रत्येक विसर्जन स्थळी स्वच्छता राखणे आवश्यक आहे. प्रत्येक विसर्जन स्थळी निर्माल्य जमा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी आणि ते योग्य ठिकाणी कंपोस्टिंगसाठी पाठवावे. उत्सवादरम्यान संभाव्य आरोग्य समस्या लक्षात घेऊन वैद्यकीय पथकांनी सज्ज राहावे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना तयार ठेवाव्यात, अशा सूचना देवून सर्व शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधून काम केल्यास गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी व्यक्त केला.