पालघर. ( प्रतिनिधी ) – पालघर जिल्ह्यासह वसई व पालघर तालुक्यासह बोईसर - तारापूर एम.आय.डी.सी मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित ग्रामस्थांच्या पुनर्वसन व तात्काळ मदतीसंदर्भात प्रभावी उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी आमदार विलास तरे यांनी जिल्हाधिकारी इंदू राणी जाखड यांना निवेदन देऊन केली आहे.
यावेळी आमदार विलास तरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यासह वसई व पालघर तालुक्यात सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण व शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल झाले असून त्यांच्या उपजीविकेवर, आरोग्यावर व दैनंदिन व्यवहारांवर गंभीर परिणाम झाला आहे. सदर परिस्थितीत काही गंभीर समस्या निदर्शनास येत आहेत की, अनेक गावे व वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे कच्ची घरे, झोपड्या तसेच घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी ग्रामस्थांना आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी जावे लागले आहे, पावसामुळे रस्ते वाहून गेल्याने आणि वाहतूक विस्कळीत झाल्याने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित झाला आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित न झाल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने भात, भाज्या, फळबागा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी वर्गावर आर्थिक संकट ओढावले आहे, पाणी साचून राहिल्याने डासांचे प्रमाण वाढले असून साथरोगांचा धोका गंभीर स्वरूप धारण करीत आहे. लहान मुले, वृद्ध व महिला यांचे आरोग्य विशेषतः धोक्यात आले आहे.
वरील परिस्थितीच्या अनुषंगाने विचार करता, आपल्यामार्फत बाधित ग्रामस्थांना शासकीय रेशन दुकानदारामार्फत अन्नधान्य, धान्य, डाळी, तेल इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा, पूरग्रस्त कुटुंबांचे तात्काळ सर्वेक्षण करून त्यांना आवश्यक ते निवारा, कपडे व इतर वस्तू उपलब्ध करून द्याव्यात, शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे महसूल विभागामार्फत तातडीने करून त्यांना पीकविमा व आर्थिक मदत देण्यात यावी, आरोग्य विभागामार्फत बाधित भागात वैद्यकीय पथके तैनात करून आरोग्य शिबिरे भरवावीत व आवश्यक औषधांचा पुरवठा करावा, निचरा व स्वच्छतेच्या दृष्टीने ग्रामपंचायती व महानगरपालिकांसोबत समन्वय साधून नाले, गटारे व पाणी साचलेली ठिकाणे तातडीने स्वच्छ करावीत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आपत्कालीन निधीचा वापर करून बाधितांना त्वरित आर्थिक मदत वाटप करण्यात यावी, बोईसर - तारापूर एम.आय.डी.सी मध्ये रस्ते सुधारणे व स्वच्छता करणे, आवश्यक असून तातडीने उपाययोजना करण्याबाबत यावी, अशी जोरदार मागणी आमदार विलास तरे यांनी जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांच्या कडे केली आहे.
पालघर जिल्हा व वसई-पालघर तालुका, बोईसर - तारापूर एम.आय.डी.सी. ही लोकसंख्येच्या दृष्टीने घनदाट असून सद्यस्थितीत अतिवृष्टीमुळे गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे बाधित ग्रामस्थांना तात्काळ दिलासा मिळावा यासाठी आपण तातडीने आवश्यक ती कार्यवाही करून जिल्हा प्रशासनामार्फत योग्य तो दिलासा द्यावा, असे ही आमदार तरे म्हणाले.
