मुंबई (प्रतिनिधी ) : सातत्याने विविध उपक्रम - कार्यक्रमांच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या वृत्तपत्र लेखकांची प्रातिनिधिक संघटना असलेल्या मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने २२ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी 'वृत्तपत्र लेखक दिन' म्हणून साजरा केला जातो. फोर्टच्या सुप्रसिद्ध तांबे उपहारगृहात २२ ऑगस्ट १९४९ रोजी दैनिक नवशक्तीचे संपादक प्रभाकर पाध्ये यांनी पहिले संमेलन साहित्यिक प्रा अनंत काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केले होते.
सन्माननीय पाहुण्यांमध्ये मुंबई सरकारचे प्रसिद्धी प्रमुख श्री अय्यर, प्रा. वा. ल. कुलकर्णी, अप्पा पेंडसे, र.गो.सरदेसाई, वा.रा.ढवळे, नि.श.नवरे, वि. ह. कुलकर्णी, व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे, रा. भी. जोशी, सुधा जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून आणि २०० वृत्तपत्र लेखक त्यावेळी उपस्थित होते. केसरीचे संपादक दि वि गोखले, इतिहास संशोधक न र फाटक यांनी शुभेच्छा पत्रे पाठवली होती.
यावर्षी हा दिवस साजरा करताना संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी लिहिलेल्या 'प्रेरक शिल्पकार' या या ग्रंथाचे प्रकाशन
माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होत आहे. वृत्तपत्र लेखक चळवळीसाठी आणि संस्थेच्या वाढीसाठी भरीव योगदान दिलेल्या स्व. ग. शं. सामंत, स्व. गणेश ल केळकर, मधू शिरोडकर, वि. अ. सावंत, विश्वनाथ पंडित यांच्या कार्याचा आढावा या ग्रंथात घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे संघाच्या वतीने "जागल्यांचा लोकजागर" हा ब्लॉग सुरु होत आहे. महाराष्ट्रातील वृत्तपत्र लेखकांना यापुढे अधिकाधिक संख्येने निर्भीडपणे आणि मुक्तपणे आता या ब्लॉगवर आपले मत व्यक्त करता येणार आहे.