Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यासाठी शासनाची जोरदार तयारी – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई, दि. १५ : वर्षानुवर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यास शासनाची यंत्रणा सज्ज झाली असून गणेशोत्सव मंडळे व घरगुती गणेश आरास स्पर्धा, चौकाचौकात रोशनाई, ड्रोन शो, विविध सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारे जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे. यावेळी प्रथमच राज्य शासन उत्सवात सहभागी होणार असून यासाठी शासनाने सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.


याबाबत मंत्री ॲड. शेलार म्हणाले, “जगात आणि देशात आपल्या गणेशोत्सवाची ओळख सर्वात मोठा महोत्सव म्हणून झालेली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे.”


शासन निर्णयानुसार तालुका स्तरापासून राज्य स्तरावर विविध गणेशोत्सव मंडळ जे धार्मिक प्रथा परंपरानुसार सहभागाने पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रमात काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना पारितोषिकाची घोषणा केली आहे. तसेच गिरगाव चौपाटीवर ड्रोन महोत्सव आयोजन करण्यात येणार असून पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई आणि राज्यातील सर्व भागात स्थानिक स्तरावर शक्य असेल त्या सार्वजनिक ठिकाणी रोषणाई करण्यात येणार असून यावर्षीपासून घरबसल्या नागरिकांना गणरायांचे दर्शन व्हावे यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात येत आहे. गणेशोत्सव काळामध्ये भजनी मंडळांना भजनामधील साहित्यासाठी थेट लाखो रुपयांचे अनुदान देण्याची योजना घोषित झाली आहे. परदेशातही गणरायाचे आगमन धुमधडाक्यात व्हावे, म्हणून हा राज्य महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा, ही भूमिका घेण्यात आली आहे.


हा ‘गणेशोत्सव- राज्य महोत्सवाचा’ शासन निर्णय गणरायाच्या चरणी घोषित करताना आनंद होत असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले. याबाबत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा आणि विविध कार्यक्रम यांचे दोन स्वतंत्र सविस्तर शासन निर्णय ही जारी करण्यात आले आहेत. पु. ल. देशपांडे कला अकदामी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे या महोत्सवाचे नियोजन व समन्वय करण्यात येणार आहे.


गणेशोत्सवात असा असेल महाराष्ट्र शासनाचा सहभाग

राज्य महोत्सवाच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार.
संपूर्ण राज्यभर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. महाराष्ट्राची कला व संस्कृती आणि परंपरेचे दर्शन या कार्यक्रमांतून घडेल. हे कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर ज्या ठिकाणी मराठी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत त्या ठिकाणीही करण्यात येईल. तसेच मराठी भाषिक बहुल भारताबाहेरील काही देशामध्ये सांस्कृतिक कार्यक्रांचे आयोजन करण्यात येईल.

  • व्याख्यानमालेचे आयोजन.

  • गणेशोत्सवाच्या निमित्ताने अध्यात्म नाट्यरंग महोत्सवाचेही आयोजन.
  • राज्यातील महत्त्वाची मंदीरे आणि सर्वजनिक गणेशोत्सवाचे देखावे यांचे ऑनलाइन दर्शन घरबसल्या व्हावे,यासाठी एक पोर्टल निर्माण करण्यात येईल.
  • उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ अंतर्गत तालुका स्तरावर स्पर्धेद्वारे विविध पारितोषिके देण्यात येतील.
  • घरगुती गणेशोत्सव आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो व्हिडिओ क्लिप्स पोर्टलवर येण्यासाठी एक प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येईल.
  • ज्या चित्रपटांमधून गणपती विषयक परंपरा, कला संस्कृती दर्शवलेली आहे, अशा चित्रपटांचा विशेष गौरव करण्यात येईल.
  • गणेशोत्सवावर आधारित टपाल तिकीट आणि नाणे काढण्यात येईल.
  • संपूर्ण राज्याभरातून गणपतीविषयक रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात येईल.
  • ‘ड्रोन शो’ चे आयोजन करण्यात येईल.
  • या राज्य महोत्सवाची माहिती संपूर्ण देशभर व्हावी यासाठी वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, रेडिओ आणि समाज माध्यमे यांच्या माध्यमातून देशभरात प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार.
  • आंतरराष्ट्रीय व आंतरराज्यीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष कार्यक्रम, उपक्रम हाती घेणार
  • उत्सवाच्या दरम्यान प्रमुख ठिकाणी विद्युत रोषणाई व सुशोभिकरण करणार.
  • पारंपारिक भजन व आरती सादर करणाऱ्या भजनी मंडळांना साहित्य वाटप, अनुदान देणार.
  • राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन.
  • विसर्जन सोहळ्यामध्ये आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी विविध सोयी-सुविधा व वाहन व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार.
  • राज्यात शिकत असणाऱ्या देशाबाहेरील विद्यार्थ्यांना या महोत्सवात सहभागी होण्यासाठी योजना,उपक्रम राबविणार.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |